जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतच मिळणार डिजिटल सातबारा उतारा
नगर सिटीझन live team-
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्रामीण भागातील सर्व शाखांमध्ये डिजिटल सातबारा, उतारा आणि आठ अ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या सभेत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी दिली.
अध्यक्ष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेची पहिलीच सभा सोमवारी झाली. बँकेच्या सभेत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत चर्चा झाली. कर्जासाठी सातबारा, उतारा आणि आठ अ आवश्यक असतात. ते यापुढे जिल्हा बँकेच्या शाखेतच उपलब्ध होणार आहेत. हा सातबारा व उतारा कर्जासाठी वापरता येईल. तलाठी कार्यालयातून सातबारा व उतारा घेण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांना कर्ज घेणे यामुळे सुलभ होणार असल्याचे शेळके म्हणाले.
शासन पुरस्कृत नाबार्डमार्फत सभासदांना खेळते भांडवले योजनेंतर्गत कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. हे कर्ज परत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. दिलेल्या मुदतीत कर्जफेड केल्यास शेतकऱ्यांना येत्या एप्रिलपासून पुन्हा कर्जाचे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत केल्यास त्यांना ३ लाख पर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खेळते भांडवल व खरीप पीक कर्ज वेळेत भरावे, असे आवाहन उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी केले.