घटस्फोटित पत्नीशी विवाह केल्याने दुकान जाळले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
घटस्फोट दिलेल्या पत्नीशी विवाह केला, म्हणून पहिला पती असलेला लतीफ यासीन शेख याने दुसर्या पतीचे दुकान जाळून टाकल्याची घटना तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूलजवळ घडली आहे.
याबाबत रहेमान अब्दुलगनी शेख (वय 65, तिसगाव) यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि 6) गुन्हा दाखल करण्यात आला. दि. 5 रोजी रात्री रहेमान शेख तिसगाव येथील घरी होते. त्यावेळी नगर येथे राहणारा त्यांचा मुलगा यासीन शेख यांचा फोन आला. तो फोनवरून म्हणाला की, रात्री झोपताना थोडे सावध झोपा.
मला लतीफ यासीन शेख याने फोनवर शिवीगाळ करून तुझ्या घरी जाऊन तुझ्या आई-वडिलांना व बायका-पोरांना जीवे मारणार आहे. तसेच तुझ्या वडिलाचे दुकान पेटवून देणार आहे. बघ रात्रीतून काय होते ते… असे सांगितल्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता रहमान शेख यांना कळले की, तुमचे वृद्धेश्वर हायस्कूल चौकातील दुकानाला आग लागली आहे. दुकानातून धूर निघत आहे. टाईम वॉच अॅड जनरल स्टोअर्स या नावाने शालेय साहित्याच्या दुकानातील एक लाखांचे वही, पेन, रजिस्टर पेपर, पेन्सिल व इतर शालेय साहीत्य, तसेच पाच लाख रुपयचे सुट्टे भाग, तसेच ग्राहकांचे कुकर, मिक्सर, जुने साहित्य, सिलिंन फॅन, अन्य साहित्य जळून खाक झाले.