हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून तरूणावर जीवघेणा हल्ला
By Admin
हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून तरूणावर जीवघेणा हल्ला
पाथर्डी : शहरातील हॉटेलमध्ये
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून सहाजणांनी मिळून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाच्या कंबरेच्या हाडाला फॅक्चर झाले असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसाठवाडी येथील नारायण मारुती शेकडे (वय ३८) हे २७ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.१५ सुमारास पाथर्डी येथील हॉटेल समोर आले होते. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या अंकुश रामा शिरसाठ यांना थोडे बाजूला व्हा असे सांगितल्याचा राग मनात धरून अंकुश शिरसाठ यांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यानंतर काही वेळातच अंकुश शिरसाठ यांनी त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले. मंगेश अंकुश शिरसाठ, आदित्य अंकुश शिरसाठ, बाळासाहेब रामा शिरसाठ, लक्ष्मण रावसाहेब शिरसाठ आणि संदीप रावसाहेब शिरसाठ यांनी एकत्र येत नारायण शेकडे यांच्यावर हल्ला चढवला.
या वेळी मंगेश शिरसाठ याने धारदार शस्त्राने डोक्यावर वार केला, तर आदित्य शिरसाठ याने लोखंडी गजाने हातावर प्रहार केला. इतर आरोपींनी लाकडी दांडके तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. हल्ल्यादरम्यान आज ठार मारून टाकायचे अशी धमकी देत शिवीगाळही करण्यात आली. या घटनेत हॉटेल मधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून मारहाणीत शेकडे यांच्या डोक्याला, हाताला, पाठीला तसेच कंबरेला गंभीर दुखापत झाली असून कंबरेच्या हाडाला फॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बाळासाहेब रामा शिरसाठ यास २९ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. पाथर्डी न्यायालयाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी करीत असून पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे हे त्यांना सहाय्य करीत आहेत.
41889
10




