अवकाळी पाऊसाची शक्यता,ढगाळ वातावरण,शेतकरी चिंतेत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 एप्रिल 2021
हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवकाळी पाऊसाची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहे.
निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे सध्या राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ होत असली, तरी दोन दिवसांनंतर तापमानवाढीसह ऊन-पावसाचा खेळ पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, तर तीन दिवसांनंतर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
राज्यात आणि देशात करोनाचा कहर सुरू असतानाच हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पुढील दोन दिवस सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर २५ आणि २६ एप्रिलला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात २६ एप्रिलला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कालावधीत बहुतांश भागात संध्याकाळी अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे.
तापभान.
सध्या देशात उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा दक्षिण तमिळनाडू ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील बहुतांश राज्यात पावसाळी स्थिती आहे. त्याचप्रमाणे उत्तर आणि पूर्वेकडील राज्यातही काही ठिकाणी पाऊस होतो आहे.
राज्यस्थिती. सध्या राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. काही भागात संध्याकाळनंतर आकाश अंशत: ढगाळ रहात असल्याने रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली आहे. दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा मात्र सरासरीच्या जवळपास आहे. कोकण विभागात तो सरासरीपेक्षा किंचित अधिक आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.