'या' तालुक्यातील केंद्रावर अगोदर कोरोना टेस्ट मगच लस, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयोग
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - रविवार 09 मे 2021
कोरोना संसर्गजन्य रोग होवू नये म्हणून अनेक प्रयोग सरकारने राबवले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढ होत असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे. आता लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी व यातून होणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशानुसार आता लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे.
राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे.
मात्र तरी सुद्धा अनेक जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून भाजी बाजार, किराणा दुकान यासह लसीकरण केंद्रावर सुद्धा नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे ही ठिकाणे कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून ओळखली जात असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार संगमनेरमध्ये अनोखा प्रयोग सूरु करण्यात आला आहे. आधी कोरोना टेस्ट आणि मग लस या नव्या मोहिमेद्वारे लसीकरण करण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी काढले असून आजपासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे.
कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन राज्यात अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. मात्र आता लसीकरण केंद्रावरच लस घेण्याआधी कोरोना चाचणी करावी लागणार असल्यानं आलेला नागरिक पॉझिटिव्ह आला तर लस वाया जाणार नाही आणि लक्षणे नसलेल्या रुगांचे लवकर निदान झाल्यामुळे उपचारही वेळेवर मिळतील, असा उपक्रम राज्यभर राबविला गेल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल आणि लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला आळा बसेल.