'या' तालुक्यातील गाळप हंगामाची उत्साहात सांगता
192 दिवसात विक्रमी 13 लाख 19 हजार मे.टन गाळप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 17 मे,2021
संगमनेर तालुक्यातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ उत्साहात झाला.
संगमनेर : 'ऊस व दुध हे शाश्वत उत्पादनाचे साधन आहे. आगामी काळात सर्व शेतकर्यांनी एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे जिवनमान उंचविण्यासाठी काम होत आहे. थोरात कारखान्याने या हंगामात विक्रमी ऊस गाळपाची कामगिरी केली आहे. कोरोना संकट असूनही 2022 च्या पावसाळ्याातील निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आण्यासाठी प्रयत्न करू,' असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020 - 21 गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, प्रताप ओहोळ, दुर्गा तांबे, अॅड.माधव कानवडे, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मण कुटे, इंद्रजीत थोरात, अमित पंडित आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, ' सहकारी संस्थांमुळे ग्रामीण विकासात मजबुती आहे. ऊस व दुध हे शाश्वत आहे. कारखान्याने यावर्षी 192 दिवसांत विक्रमी 13 लाख 19 हजार मे.टनाचे गाळप केले आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबकसह आधुनिक प्रणालीचा वापर करावा लागेल. कारण कार्यक्षेत्रातील ऊस वाढी नंतर बाहेरील वाहतूकीचा खर्च कमी होवून जास्त भाव देता येवू शकतो. तसेच आपल्या जिवनातील अत्यंत महत्वाचे निळवंडे कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळविला आहे. मागील दीड वर्षात लॉकडाऊनमुळे मजुर स्थलांतरित झाले आहे. या कामात अडथळे येत आहे. तरी ही 2022 च्या पावसाळ्याातील पाणी शेतकर्यांना देण्याचा आपला प्रयत्न आहे.'