मुळा धरणात बुडून एक जणाचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मुळा धरणात काल, रविवारी एक जण बुडाला होता. त्याचा रात्री उशीरापर्यंत शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नव्हता. अखेर सोमवारी सायंकाळी सबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. रावसाहेब भिमाजी मते असे धरणामध्ये बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन राहुरी शहरातील एका हॉटेलमधील चार कर्मचारी धरणाचे पाणी पहायला गेले. मात्र त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. यापैकी दोन जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी रावसाहेब भिमाजी मते हा धरणाच्या पाण्यात बुडाला. त्याचा शोध घेतला असता तो रविवारी रात्री उशीरापर्यंत सापडला नव्हता. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बोकील, मोरया गृपचे अध्यक्ष गोरख अडसुरे, कॉन्स्टेबल अण्णा चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मृत तरुणाला गावातील मच्छीमार करणारे आदिवासी व भोई समाजाच्या तरुणांनी पाण्याबाहेर काढण्यासाठी शोधकार्य सुरू केले. अखेर सोमवारी सायंकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.