इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या कामगारांची आॕनलाईन नोंदणी आवश्यक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जास्तीत जास्त कामगारांची त्या त्या आस्थापनेने ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाच्या कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनाचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कामगार विभागातर्गत बांधकाम कामगारांकरिता मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते भोसले आखाडा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात ११ कोटी लोकसंख्या असून त्यापैकी ५ कोटी कामगार आहेत. यात ४ कोटी ६० लाख असंघटीत कामगार आहेत. फक्त ४० लाख संघटीत कामगार आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी नव्याने मंडळ स्थापन करत आहे. यामध्ये ऊसतोड कामगारांचे मंडळ स्थापन केले असून चालक, रिक्षाचालक, ट्रॅकचालक, शेतमजूर, हॉटेल कामगार यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ सुरु करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांच्या हस्ते ५ प्रतिनिधिक बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्डचे (ओळखपत्र) वाटप करण्यात आले. तसेच विविध कल्याणकारी योजनेतर्गत लाभ मिळालेल्या बांधकाम कामगारांना विविध योजनेच्या अंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार निलेश लंके, उपमहापाैर गणेश भोसले, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चू. श्रीरंगम, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष अमित मुतथा उपस्थित होते.