मोहटा देवी मंदिराबाबत जिल्हा प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटे यंदा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवातील यात्रेला प्रशासनाने पूर्णतः बंदी घातली आहे. मोहटादेवीचे मंदिर भाविकांसाठी खुले करून दर्शन घेण्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासन घेणार आहे, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी, ५ ऑक्टोबरला मोहटादेवी गडावर जिल्हा प्रशासन,मोहटा देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ आदींची संयुक्तरित्या रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, मोहटा देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार वेलदे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे आदी उपस्थित होते. नवरात्री उत्सवात मोहटादेवीच्या दर्शन घेण्यासाठी राज्यातून भाविक गडावर लाखोंच्या संख्येने येत असतो. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा फैलाव गर्दीतूनच होतो. हे पाहता मंदिर भाविकांसाठी खुले करावे किंवा नाही, याबाबत निर्णय जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला असून त्यासंदर्भात आज मंदिर चालू अथवा बंद याची अधिकृत घोषणा होणार आहे. गर्दी होणार नाही, कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील, असे हमीपत्र जिल्हा प्रशासनाने मोहटा देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाकडून मागवण्यात आले असून त्यानंतर ठोस निर्णय होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी मोहटादेवीच्या परिसर आणि मंदिराची पाहणी केली.