भाजप पक्ष व व्यापारी संघटनांचा महाराष्ट्र बंदला विरोध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, सोमवारी पुकारलेल्या 'सरकारी बंद'ला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षानेच आवाहन केल्याने सर्व व्यवहार बंद राहण्याची शक्यता आहे. एसटीसह रिक्षा सेवेवरही बंदचा परिणाम होणार आहे. दरम्यान बंद हाणून पाडण्यासाठी भाजपनेही विविध पातळ्यांवर तयारी केली आहे.
कोरोनाकाळातील निर्बंधातून आता कुठे अर्थव्यवस्था सावरत असताना सत्ताधारी पक्षांनीच बंदचे आवाहन केल्याने त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. बाजारपेठांमध्ये व्यवहार वाढलेत. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी वाढली आहे. भाजप आणि व्यापारी संघटनांनी बंदला विरोध दर्शविला आहे. मात्र बहुतांशी व्यापारी संघटना या भाजपशी संबंधित असल्याने व्यापारी संघटनांनी बंदला विरोध दर्शविल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. दुकाने तसेच व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्धार व्यापारी संघटनांच्या पदधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी पत्रक काढून शेतकरी व व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे.