पाथर्डी बाजार समितीची सभा ऑनलाइन
नगर सिटीझन live टिम-
पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला 'संत भगवानबाबा व संत वामनभाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती' आणि 'बबनरावजी ढाकणे व्यापारी संकुल' अशी नावे देण्याचा ठराव बाजार समितीने संमत केला.
बाजार समितीच्या मिरी येथील शाखेला 'राष्ट्रसंत तनपुरे महाराज बाजार समिती, मिरी' असे नाव देण्यात येईल. मिरीच्या व्यापारी संकुलाचे '(कै.) रावसाहेब म्हस्के व्यापारी संकुल, मिरी' असे नामकरण करण्यात आले. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत ऍड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सभापती बन्सीभाऊ आठरे, उपसभापती मंगल गर्जे, बाळासाहेब घुले, वैभव दहिफळे, विष्णू सातपुते यांच्यासह सभासदांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.
ऍड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता आली. तेव्हा समितीवर बारा लाखांचे कर्ज होते. ते फेडून, कोरोनासारखे संकट असतानाही बाजार समितीने तिसगाव येथील विकासकामे, मिरी येथे जागाखरेदी, पाथर्डीच्या बाजार समितीतील विकासाची कामे केली. शेतकऱ्यांना विविध सेवा पुरविण्याचे काम केले. सचिव दिलीप काटे यांनी प्रास्ताविक केले. तर बाळासाहेब घुले यांनी आभार मानले.