भरदिवसा घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
पाथर्डी - प्रतिनिधी
दुपारच्यावेळी घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून आतील सामानाची उचकापाचक करून सोने व रोख रक्कम असा तब्बल पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
ही घटना पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे घडली. पोलिस आउट पोस्टपासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या जयदीप चांगदेव तुपे यांच्या घरी ही चोरी झाली आहे.
भरदिवसा व पोलिस चौकीजवळ झालेल्या या घरफोडीमुळे मिरीसह परिसरात खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर काही वेळाने या ठिकाणी श्वानपथकासह ठसेतज्ञाला देखील पाचारण करण्यात आले होते.
घरगुती कामामुळे तुपे कुटुंबीय काहीवेळ बाहेर जाताच अज्ञात चोरट्यांंनी भरदिवसा त्यांच्या घरात घुसून त्यांच्या घरातील चौदा तोळे अंदाजे किंमत सुमारे दोन लाख ७६ हजार रुपये व रोख रक्कम पाच हजार रूपये असा एकुण दोन लाख ८१ हजार रूपयांचा एवज लंपास केला.
याबाबत जयदीप तुपे यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आठ दिवसांपूर्वीच मिरीच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला होता.
त्यानंतर पुन्हा एकदा भर दिवसा घरात घुसून पावणे तीन लाख रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडल्याने मिरी परिसरात गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे हेच या दोन्ही घटनांवरून दिसून येत आहे.