महाराष्ट्र
माजी सरपंचांच्या हत्या प्रकरणात चुकीचा तपास भोवला; चक्क पोलिस अधिकाऱ्यालाच शिक्षा
By Admin
माजी सरपंचांच्या हत्या प्रकरणात चुकीचा तपास भोवला; चक्क पोलिस अधिकाऱ्यालाच शिक्षा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खून प्रकरणात चुकीचा तपास केल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यालाच शिक्षा झालीय. आनंद भोईटे असे शिक्षा झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद भोईटे हे सध्या बारामती येथे अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील ( Ahmednagar News Update ) पारनेर तालुक्यामधील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणाचा तपास भोईटे यांनी केला. परंतु, चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांना राज्य शासनाने शिक्षा दिली आहे.
संदीप वराळ यांच्या खुनाचा तपास करताना आनंद भोईटे यांनी दोन बनावट साक्षीदार दाखवले असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी ज्यांना साक्षीदार करण्यात आले होते त्यातील साक्षीदार अर्जुन गजरे हे मयत होते तर दुसरे साक्षीदार प्रकाश रसाळ हे घटना घडली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत ही बाब समोर आली.
साक्षीदारांच्या जबाबावर या गुन्ह्यातील कटाचा आरोप असलेले बबन कवाद आणि मुक्तार इनामदार यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे तक्रार देखील केली. परंतु त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत धाव घेतली होती. त्यानंतर खंडपीठात हे प्रकरण चालले आणि बनावट साक्षीदार दाखवल्याप्रकरणी तपास अधिकारी आनंद भोईटे यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर भोईटे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती घेतली. तर दुसरीकडे गृह विभागाने आनंद भोईटे यांची चौकशी करून ते दोषी असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. त्यानंतर शासनाने आनंद भोईटे यांना पगारवाढ बंद रोखण्याची शिक्षा दिली, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, चक्क पोलिस अधिकाऱ्यालाच शिक्षा झाल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडालीय. पोलिस अधिकाऱ्याला शिक्षा
झालेल्या प्रकरणाची आता संपूर्ण राज्यभर चर्चा होत आहे. शिक्षा झालेले आनंद भोईटे हे सध्या बारामती येथे अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
Tags :
407158
10