पाथर्डी- वाहन झाडाला धडकून दोघे ठार; चांदबिबी महालाजवळ अपघात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चारचाकी वाहन झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. नगर-पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी महालाजवळ बुधवारी (दि.2) मध्यरात्री हा अपघात झाला.
या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. कैलास जाधव (वय 42) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर, सत्तारभाई शेख (वय 60, दोघे रा.घाटशिरस, ता. पाथर्डी ) यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या अपघातात बाळासाहेब चोथे, भाऊराव शिंदे व चालक अशोक चोथे (सर्व रा. घाटशिरस, ता.पाथर्डी) हे जखमी झाले आहेत.
बुधवारी घाटशिरस येथील काही ग्रामस्थ चारचाकी वाहनातून पुणे जिल्ह्यातील डोणजे येथे एका धार्मिक कार्यक्रमात निमित्त गेले होते. तेथील धार्मिक कार्यक्रम उरकून ते सायंकाळी पुन्हा नगरमार्गे चारचाकी वाहनातून गावाकडे येत होते. मध्यरात्री चांदबिबी महालाजवळ चालकाला डुलकी लागल्याने चारचाकी वाहन जवळच्या एका लिंबाच्या झाडाला जाऊन धडकल्याने हा अपघात झाला.