पाथर्डी तालुक्यामध्ये लॉजवर छापासत्र
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात लॉज व्यवसाय करणार्यांवर पोलिसांनी अचानक धाडी टाकत, तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. कारवाई दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणार्या अनेक लॉजमालकांवर पोलिसांनी कारवाई केली.
पाथर्डी शहरात नियम धाब्यावर बसवून लॉजिंग व्यवसाय चालू आहेत. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्या नंतर नियमांची पायमल्ली करणार्या लॉज धारकांना कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला आहे. गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी शहरातील लॉजवर अचानक छापे टाकून तपासणी केली. तालुक्यात सर्वच ठिकाणी तपासणी मोहीम राबविणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.
शहरात विविध ठिकाणी लॉजिंगचा व्यवसाय सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून व्यवसाय केला जातो. या ठिकाणी आक्षेपार्ह कृत्य केले जाते. त्याकडे आता पोलिसांनी आपला वॉच ठेवायला सुरुवात केली आहे. लॉजवर मुक्कामी येणारे ग्राहक असोत किंवा काही तास विसावा घेण्यासाठी येणारे ग्राहक असोत; या सर्वांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. लॉजिंगचा व्यवसाय करताना आलेल्या ग्राहकांकडून संपूर्ण पत्ता, त्यांच्या ओळखपत्रांची झेरॉक्स, मोबाईल नंबर, त्यांचे येण्याचे कारण आपल्या रजिस्टरमध्ये नोंद घेणे कायद्याने बंधनकारक आहे. लॉजिंगमध्ये येणार्या प्रत्येक व्यक्ती प्रवेश करताना प्रथमदर्शनीय भागात अद्ययावत
सीसीटीव्ही असणे बंधनकारक आहे. मात्र, अशा नियमांची पायमल्ली काही लॉज व्यावसायिक करीत आहेत. अनेक आरोपींनी लॉजवरच मुक्काम केल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय अनेक लॉजवर अवैध धंदे बिनधास्त सुरू असल्याचेही पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.