महाराष्ट्र
84651
10
डॉक्टरला निवडून दिलं अन् भलतीकडेच जावून बसला
By Admin
डॉक्टरला निवडून दिलं अन् भलतीकडेच जावून बसला.मला वाटलं साधा माणूस आहे.- शरद पवार
मविआ'चे 31 खासदार माझ्या शेतकऱ्यांसाठी प्रयत्नांची शिकस्त करतील
रोहित पाटलांनंतर विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले
किरण लहामटेला खाली बसवा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून विधानसभेसाठी आणखी एका तरूण उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे (Amit Bhangre) यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन शरद पवारांनी ( Sharad Pawar) केलं.
ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांना खाली बसवा असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे. अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवारांनी हे आवाहन केलं आहे.
शरद पवारांनी या आधी तासगाव मतदारसंघातून दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता अकोले मतदारसंघातून दुसरा तरुण उमेदवार जाहीर केला. त्यामुळे अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे विरुद्ध शरद पवार गटाचे अमित भांगरे अशी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे.
डॉक्टरला निवडून दिलं अन् भलतीकडेच जावून बसला
अकोलेकरांना आवाहन करताना शरद पवार म्हणाले की, अमित भांगरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या. तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला (आमदार किरण लहामटे) मी संधी दिली. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. त्यांनी काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं भाषण केलं होतं. पण मुंबईत गेल्यानंतर मात्र हा भलतीकडे जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे. आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही.
किरण लहामटेला खाली बसवा
अकोलेतील आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि या ठिकाणी अमित भांगरेंना संधी द्या असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
या आधी शरद पवारांनी सांगली जिल्ह्यातील तासगावमधून रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर करमाळ्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा केली. आता अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी तीन उमेदवार ठरल्याचं दिसून येतंय.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. महाविकास आघाडीचे लोकसभेतील खासदार हे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील, असे शरद पवार म्हणाले.
नगर जिल्ह्यातील अकोले येथील बाजारतळावर लोकनेते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
लोकसभेत पाठविलेले ‘मविआ’चे 31 खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आपल्या प्रयत्नांची शिकस्त करतील, हा विश्वास मी जनतेला देतो. आजपासून 70 दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. निश्चितच महाराष्ट्रात सर्वसामान्य माणूस व गोरगरीब शेतकऱ्यांसह आयाबहीणींची सत्ता येईल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे आल्यावर लोकांना काय दिसले, तर आपल्याच शेतीत उत्पादित शेतीमालाला योग्य किंमत मागण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांना हेच दाखवून दिले, अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी केली.
शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थान साथी दशरथ सावंत यांनी भूषविले. यावेळी खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माकपचे राष्ट्रीय नेते अशोक ढवळे, काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले, श्रीमती सुनिता भांगरे, अमित भांगरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, महेश नवले, विनोद हांडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुरेश गडाख यांनी केले. मेळाव्यात अशोक बाबर, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, दिलीप भांगरे, जयश्री थोरात, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्ते व बहुसंख्य महीला, युवक उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारमधील राज्यकर्त्यांना शेती व शेतकरी यांच्याविषयी अस्थाच नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव ठरवून शेतमालाची किंमत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. पण या सरकारकडून ते होत नाही. शेतीला जोडधंद्या म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय सुरू केले. दूध व कांद्यासह शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला रास्त किंमत मिळाली पाहीजे. पण शेतमालाला हमीभाव देण्याची तयारी या सरकारची नाही. मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून पाठविले. त्यात नगर जिल्ह्यातून दोन्ही जागांवर ‘मविआ’चे खासदार निवडणूक दिले. केंद्रातील
सरकारकडून माझ्या शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक होणार नसेल तर निश्चितपणे पाठवलेले खासदार न्याय मिळवून देतील, असे शरद पवार यांनी ठणकावले.
अकोले हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल अतिवृष्टीचा तालुका आहे. महाराष्ट्रातील एके काळच्या दुष्काळी भागाला हक्काचे पाणी देण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण भूमिका घेणारा अकोले तालुका आहे. या तालुक्यात लोकांच्या हिताची जपवणूक करणारे नेतृत्व जन्मला आले, यांच्यामध्ये यशवंतराव भांगरेचे नाव घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी जेव्हा पहिल्यांदाच गेलो तेव्हा लोकांचे व आदिवासींचे प्रश्न प्रामाणिकपणाणे मांडणारे जे विधानसभेचे सदस्य होते त्यामध्ये यशवंतराव भांगरेचा उल्लेख हा करावाच लागेल. तत्कालीन आमदार यशवंतराव भांगरे यांनी विधानसभेत आदिवासी भागांचे प्रश्न मांडले. यशवंतराव यांच्यानंतर अशोक भांगरे यांनीही तोच विचार पुढे नेण्याचे काम केले. नंतरच्या काळात ही जबाबदारी अशोक भांगरे यांनी घेतली, असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोल्यातील विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचा नामोल्लेख टाळत शरद पवार यांनी टिकास्त्र सोडले. मला वाटलं साधा माणूस आहे, जनतेची साथ सोडणार नाही. माझ्या शब्दाखातर तुम्ही डॉक्टरला निवडून दिले, ती माझी चूक झाली. सुरुवातीला त्याने इथं भाषण केलं, मी शरद पवारांना कधी सोडणार नाही. नंतर मुंबई गेला व तिकडे जाऊन बसला. ज्याला बसायचं कुठ ते कळत नाही, त्याला योग्य ठिकाणी तुम्ही बसवा, असे आवाहन शरद पवार यांनी अकोल्याच्या जनतेला केले.
Tags :

