दहावी बोर्ड परीक्षेला एजंटकडून फसवणूक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील काही शिक्षण संस्थांकडून एजंटच्या माध्यमातून पुणे-मुंबईसारख्या शहरातील विद्यार्थ्यांना विद्यालयात न येता, पास करण्याची हमी देऊन लाखो रूपये लुटण्याचे प्रकरण सुरू आहेत.
पुण्यातील एका महिलेने आपल्या दोन मुलांना दहावीच्या परीक्षेला पास करून देण्यासाठी साठ हजार रुपये मध्यस्थ एजंटमार्फत दिले. मात्र, संबंधित महिलेच्या एकाच मुलाचे परीक्षा प्रवेश पत्र आले. मात्र, हॉल तिकीटाचे कारण देत दुसर्या मुलाला परीक्षेला प्रवेश न दिल्याने या महिलेने पाथर्डी बसस्थानकावर एकच गोंधळ केल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
त्यावेळी त्या महिलेला अश्रू अनावर झाले होते. हा प्रकार गुरवारी दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी असलेल्या मराठी पेपरला घडला. या महिलेने बस स्थानकावरच एजंटाच्या नावाने टाहो फोडत, माझे पैसे मला परत द्या, माझ्या मुलांना मला परत घेऊन जायचे आहे, तुम्ही मला फसविले, आम्ही खूप गरीब माणसे आहोत, आम्ही पै-पै करून जमविले आहेत, अशी आर्त विनवणी ही महिला करत होती.
तालुक्यातील काही विद्यालयात दहावी आणि बारावीला जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी प्रवेश घेऊन थेट परीक्षेला येतात. त्यानंतर संस्थाचालक व एजंट यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण होऊन विद्यार्थी कॉपी पुरवून पास करण्याची हमी दिली जाते. सध्या असा अभद्र युतीचा गोरखधंदा पाथर्डी तालुक्यात जोमात चालू आहे. यातून शिक्षण संस्था चालक व एजंट यांनी मोठी माया गोळा केली आहे. तालुक्यातील या गैरप्रकाराला शिक्षण विभाग कधी आळा घालणार, असा सवाल विचारला जात आहे.