विद्युत रोहित्र जळाल्याने द्राक्षेंच्या बागेचे नुकसान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील वसंत कचरे यांच्या शेताजवळील विद्युत रोहित्र जळाल्याने द्राक्षेंच्या बागेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, पाडळी येथील शेतकरी वसंत रावसाहेब कचरे यांच्या द्राक्षं बागेच्या शेजारी विद्युत रोहीत्र होते. ते विद्युत रोहित्र तसेच लाईनच्या तारा तुटल्याने त्यांची काढणीला आलेली द्राक्षांची बाग, द्राक्षं मंडप तसेच आठ ते दहा ट्रॅक्टर सेंद्रिय खत जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याचे सुमारे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले.
यापूर्वी रोहित्र असलेल्या शेजारील शेतकऱ्यांनी वीज महामंडळास वारंवार रोहित्र अन्यत्र हलविण्याचे सांगितले होते, परंतु वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांने, कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, दखल घेतली नाही, त्यामुळे कचरे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या नुकसान भरपाईची व रोहित्र दुसरीकडे हलविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.