महाराष्ट्र
पोलिसांच्या सोयी-सुविधांसह घरांसाठी निधी देणार : अजित पवार
By Admin
पोलिसांच्या सोयी-सुविधांसह घरांसाठी निधी देणार : अजित पवार
पोलीस कार्यालय आणि 112 निवासस्थानांचे उद्घाटन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व पोलीस अमंलदारांच्या 112 निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (ता.6) झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसाळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील 75 पोलीस ठाण्यांचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास 860 कोटी उपलब्ध करून दिली आहेत. या निधीत जुलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल, असा शब्द मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देतो. पोलिसांसाठी 535 स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही, असे स्पष्ट करत पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणार्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल असे काम पोलिसांनी करू नये, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 2 महिला पोलीस व 1 पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संयोजन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनील सांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाब पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.
Tags :
29209
10