जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
५ जून जागतिक पर्यावरण दिन हा सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने पृथ्वीचे तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता विविध उपक्रम आयोजित केले जातात.
याच अनुषंगाने येथील विद्या कॉलनी परिसरातील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. मन्सूर शेख यांनी शहराचे स्वच्छता दूत असणाऱ्या पाथर्डी नगरपरिषद च्या घंटा गाडी कर्मचाऱ्याचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
घंटागाडी द्वारे कचऱ्याचे व्यवस्थापन व वर्गीकरण हे कर्मचारी अतिशय प्रामाणिक पणे करीत आहेत. त्याचसोबत शहर स्वच्छतेचे अविरत कार्य हे कर्मचारी करतात. या द्वारे पर्यावरणाचे रक्षण केले जाते. त्यांच्या या कार्याचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रा. मन्सूर शेख यांनी केले.या प्रसंगी घंटा गाडी कर्मचारी लक्ष्मण बालवे व गोरक्ष नारायण जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे नवऊर्जा मिळाल्याचे समाधान या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी सौ. नफिसा शेख, अस्मा आणि आलिया शेख उपस्थित होते. पर्यावरण दिना निमित्त केलेल्या या उपक्रमाचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.