महाराष्ट्र
Breaking- 341 सोसायटय़ांच्या निवडणुका महिनाभरात होणार 785 विकास सोसायटय़ांच्या निवडणुका पूर्ण
By Admin
Breaking- 341 सोसायटय़ांच्या निवडणुका महिनाभरात होणार 785 विकास सोसायटय़ांच्या निवडणुका पूर्ण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
785 सोसायटय़ांची निवडणूक प्रक्रिया सुरू अथवा पूर्ण झाली आहे. उर्वरित 341 सोसायटय़ांच्या निवडणुकांची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली आहे.
जानेवारी 2020 पासून मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे लांबलेल्या जिह्यातील विविध कार्यकारी सोसायटय़ांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहेत. जिह्यात 1 हजार 126 सोसायटय़ांच्या निवडणुकीची प्रक्रिया सहा टप्प्यांत राबविण्यात येत आहे.
नगर जिल्हा सहकाराचा बालेकिल्ला आहे. जिह्यात सहकारी संस्थांची संख्या ही मोठी असून, जिल्हा बँक, सहकारी बँका, शिक्षक बँक, शासकीय कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षकांची सोसायटय़ा, बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायटय़ा, मजूर संस्था, गृहनिर्माण सहकारी यांचे मोठे जाळे आहे. या सर्वांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर असून, कोरोनामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्या होत्या. यात जिह्यातील सर्वच बाजार समित्यांची मुदत संपल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रम सहकार विभागाने हाती घेतला होता. या बाजार समित्यांसाठी विविध कार्यकारी सोसायटय़ांचे संचालक हे मतदार असून, मुदत संपल्यामुळे या संचालकांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानात भाग घेता येणार नव्हता. यामुळे काही सोसायटय़ांचे संचालक न्यायालयात गेले आणि न्यायालयाने बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या आधी सोसायटय़ांची निवडणूक पूर्ण करण्याचे निर्देश सहकारी विभागाला दिले. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून सहकार विभागाने जिह्यात मुदत संपलेल्या 1 हजार 126 सोसायटय़ांचा निवडणूक कार्यक्रम हाती घेतला आहे. या निवडणुका पूर्ण करण्यासाठी सहकारी विभागाने 1 ते 6 टप्पे पाडले असून, प्रत्येक टप्प्यात जिह्यात
एकाच वेळी सोसायटय़ांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.
सोसायटय़ांच्या निवडणुका पूर्ण करण्यासाठी सहकारी विभागातील अधिकारी-कर्मचारी, शासकीय लेखा परीक्षक विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि गट सचिवांची मदत घेण्यात आहे. या निवडणूक प्रक्रियेत जवळपास 1 हजार अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत. आतापर्यंत जिह्यातील 785 निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे, तर 341 सोसायटय़ांची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार आहे.
नगर 70, संगमनेर 79, अकोले 50, कोपरगाव 93, राहाता 54, राहुरी 71, श्रीरामपूर 42, नेवासा 62, शेवगाव 49, पाथर्डी 36, जामखेड 29, कर्जत 47, श्रीगोंदा 73 आणि पारनेरमधील 59 सोसायटय़ांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. वाळकी (ता. नगर) गावातील विविध कार्यकारी सोसायटय़ांची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. या ठिकाणी निवडणुकीतील उमेदवार यांचे निधन झाल्याने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी नव्याने निवडणूक प्रक्रिया घेणार आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार जिह्यातील बाजार
समित्यांच्या निवडणुकांच्या आधी तातडीने जिह्यातील सहकारी सोसायटय़ांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. बाजार समित्यांच्या मतदान प्रक्रियेत भाग घेता यावा, यासाठी ग्रामीण भागात सोसायटय़ांचे संचालक होण्यासाठी चढाओढ दिसत आहे.
- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, तथा निवडणूक निर्णय अधिकारी, सहकारी सोसायटय़ा.
Tags :
521
10