हस्तकला, कार्यानुभव कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो- संजय ससाणे
दुर्गादेवी विद्यालयात हस्तकला व कार्यानुभव कार्यशाळा संपन्न
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील जाटदेवळे येथील दुर्गादेवी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हस्तकला व कार्यानुभव कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या माध्यमातून नवनिर्मितीचा आनंद घेतला.
यावेळी पाथर्डी तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय ससाणे, सचिव किशोर जगताप, उपाध्यक्ष गणेश सरोदे, कार्याध्यक्ष संजय गटागट, मुख्याध्यापक राजाराम नाकाडे, मंगेश उदमले, सीमा राठोड, निलेश रुईकर, बाबासाहेब डोंगरे, राजेंद्र राठोड आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी अहमदनगर येथील कलाशिक्षिका प्राची थिगळे यांनी हस्तकला व कार्यानुभवाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. कार्याध्यक्ष संजय गटागट यांनी इकोफ्रेंडली गणपती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी कलाशिक्षक संघाचे संजय ससाणे म्हणाले की, हस्तकला व कार्यानुभव सारख्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो आणि त्यातून चांगल्या दर्जाचा कलाकार घडत असतो. यासाठी विद्यालयात असे कार्यक्रम होणे महत्त्वाचे आहे.
या कार्यशाळेत दुर्गादेवी विद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिंनी बहुसंख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी क्विलिंग स्ट्रीप, क्विलिंग निडल (सुई), फेविकॉल, डेकोरेशनसाठी स्टोनचा वापर करून इकोफ्रेंडली राख्या बनवल्या. तसेच साटन रिबन, लटकन व तारेचा वापर करून विद्यार्थिनींनी झुंबर बनविले.
या कार्यक्रमात मुख्याध्यापक नाकाडे, किशोर जगताप, गणेश सरोदे यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद सानप हे होते. प्रास्ताविक कलाशिक्षक अविनाश नेहुल यांनी केले. राजू शेख यांनी सूत्रसंचालन केले तर आभार महादेव दौंड यांनी मानले.
दुर्गादेवी विद्यालयाचे कलाशिक्षक अविनाश नेहुल यांच्या पुढाकारातून साकारलेली ही कार्यशाळा मान्यवरांच्या उपस्थितीमुळे यशस्वी झाली.