महाराष्ट्र
इस्तरी (लॉन्ड्री) दुकान चालकाने परत केले कपड्यातील 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 20 हजार रुपये
By Admin
इस्तरी (लॉन्ड्री) दुकान चालकाने परत केले कपड्यातील 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 20 हजार रुपये
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एकीकडे पैसा, दागदागिन्यांसाठी सख्खे पण वैरी होत असल्याचं चित्र असताना मात्र शिर्डी जवळील राहाता माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना उघडकीस आली आहे.
शिर्डी जवळील राहाता शहरात एका लॉन्ड्री चालकाने सुमारे 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 20 हजार रुपयांची रोख रक्कम त्याने संबंधित ग्राहकाला परत करत या लोभी जगात आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दर्शन घडवले. लॉन्ड्री चालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वट स्तरातून कोतुक होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील राहाता शहरात ही घटना घडली आहे. मनात कुठलाही मोह न बाळगता लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांनी सापडलेले तब्बल दहा लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम, निरपेक्ष भावनेने ग्राहकास परत केली आहे. सोने, पैसा, संपत्ती यांचे आकर्षणा पायी भ्रष्ट झालेल्या सध्याच्या युगात राजेश वाघमारे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जग कितीही बदलले तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. प्रामाणिकपणा आजही जगात शिल्लक आहे याचा अनुभव राहाता शहरात बघायला मिळाला.
शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांच्याकडे एका ग्राहकाने पिशवी भरून कपडे इस्त्रीसाठी आणले होते. कामाच्या व्यस्ततेमुळे दोन-तीन दिवस या पिशवीतील कपडे इस्त्री करणे वाघमारे यांना शक्य झाले नाही. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इस्त्रीसाठी पिशवीतील कपडे बाहेर काढत असताना राजेश वाघमारे यांना त्या पिशवीत एक छोटीशी कापडी थैली आढळून आली. यामध्ये सोन्याची कर्णफुले, नथ, बांगड्या व इतर दागिने तसेच रोख रक्कम वीस हजार रुपये आढळून आली. वाघमारे यांनी लागलीच याबाबतची माहिती संबंधित ग्राहकाला फोन द्वारे दिली. दुकानात येऊन आपले सोन्याचे दागिने तसेच रक्कम घेऊन जाण्याची विनंती केली. संबंधित ग्राहकाला आपल्या पिशवीत सुमारे दहा लाख किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये होते याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती,असे असताना सुद्धा या लॉन्ड्री चालकाने आपली प्रामाणिकता दाखवत सोन्याचे दागिने व पैशाचा कुठलाही मोह न ठेवता ग्राहकाला परत देऊन टाकले.
वाघमारे यांच्या निकटवर्तीयांना कळताच ही बातमी शहरभर पसरली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी लॉन्ड्री चालक वाघमारे यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले. तर संबंधित ग्राहकाने देखील त्यांचे आभार मानलेत. तर लॉन्ड्री हा आमचा पारंपारिक व्यवसाय असून आई-वडिलांनी पहिल्यापासून अतिशय चांगले संस्कार व प्रामाणिकपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे सोने, नाणे, पैसा यापेक्षाही नीतिमत्ता व व्यवसायातील प्रामाणिकपणा हा खूप किमती असून याची बरोबरी कशातच होऊ शकत नाही. कष्टाचा रुपया आपल्या सत्कारणी लागेल परंतु हरामाचा आपल्याला कधीच उपयोगी पडणार नाही. त्यामुळे कष्टाच्याच पैशाला व कष्टाने घेतलेल्या वस्तूला आमच्या कुटुंबात स्थान असल्याची भावना लॉन्ड्री चालक राजेश वाघमारे यांनी व्यक्त केली.
एकीकडे राज्यात सत्तांतर होऊन कोण कोणाशी प्रामाणिक असा प्रश्न निर्माण असताना वाघमारे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा कौतुकाचा विषय आहे. वाघमारे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा प्रत्येक व्यक्तीच्या रुपात समोर आला तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम होईल यात शंका नाही.
Tags :
12455
10