माणिकदौंडी- पाथर्डी रस्त्यावरील खड्डे बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन
शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
पाथर्डी - प्रतिनिधी
माणिकदौंडी- पाथर्डी रस्त्यावरील शिरसाटवाडीतील कोंगे, घुले, ढाकणे वस्ती व रांजणी फाटा येथील मोठमोठे खड्डे तात्काळ भरावेत, अशी मागणी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात पालवे यांनी म्हटले आहे की, माणिकदौंडी- पाथर्डी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून शिरसाटवाडी सह माणिकदौंडी परिसरातील नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तात्काळ हे खड्डे बुजवा अन्यथा आपल्या कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच अविनाश पालवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.