महाराष्ट्र
पंकजा मुंडे उद्या पाथर्डीच्या दौऱ्यावर, मौन सुटण्याच्या प्रतीक्षेत अवघा महाराष्ट्र
By Admin
पंकजा मुंडे उद्या पाथर्डीच्या दौऱ्यावर, मौन सुटण्याच्या प्रतीक्षेत अवघा महाराष्ट्र
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पंकजांच्या स्वागताची जय्यत तयारी
पंकजा मुंडे यांच्या मंगळवारच्या दौऱ्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पाथर्डी शहरात 20 कमानी तर 50 पेक्षा जास्त फ्लेक्स बोर्ड लागले आहेत. उद्याच्या दौऱ्यासाठी समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. पाथर्डीतील विषारी औषध घेणारा समर्थक मुकुंद गर्जे याची भेट पंकजा घेतील. तसेच मोहटादेवीचंही दर्शन घेतील. मंदिर परिसरातही पंकजांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे
विधान परीषद निवडणूकीची (MLA election ) मेदवारी डावलण्यात आल्यानंतर मौनात गेलेल्या पंकजा मुंडे उद्या प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.
भाजपने निवडणुकीसाठी उभ्या केलेल्या पाच उमेदवारांमध्ये पंकजा मुंडेंचं (Pankaja Munde) नाव असण्याची दाट शक्यता होती. संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, असं वक्तव्यही पंकजांनी केलं होतं. पण नाव बाद झालं आणि पंकजा मौनात गेल्या. त्यानंतर थेट विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतरच उद्या पंकजा मुंडे महाराष्ट्रात जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावतील. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये (Patherdy) त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. पंकजांची उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर शेकडो समर्थकांनी नाराजी बोलून दाखवली. काहींनी निदर्शनं केलं, रास्ता रोको केलं तर काहींनी सोशल मीडियातून धुसपूस बोलून दाखवली. पाथर्डीच्या एका कार्यकर्त्यानं तर थेट विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परळीप्रमाणेच पाथर्डीमध्ये मुंडे समर्थकांचा मोठा वर्ग आहे. पाथर्डी दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे विष प्राशन केलेल्या कार्यकर्त्याला भेटतील. यावेळी मोहटा देवीचंही दर्शन घेतील.
अस्वस्थता उफाळणार?
विधान परिषदेची उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे प्रथमच जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाल्यामुळे पंकजा मुंडे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील फार कमी कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. विधान परिषदेच्या निमित्ताने तरी त्यांना महाराष्ट्रातील सक्रिय राजकारणात येण्याची संधी होती. मात्र तीदेखील डावलण्यात आल्याने पंकजांचे समर्थक प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांची नाराजी अनेक निदर्शनांमधून व्यक्त होतेय. पण पंकजांनी घेतलेलं मौन अद्याप सुटलेलं नाही. उद्याच्या कार्यक्रमात त्यांना माध्यमांसमोर प्रतिक्रिया द्यावीच लागणार आहे. यावेळी त्यांची अस्वस्थता उफाळून येणार का, अशी चर्चा केली जातेय.
की संयमच बाळगणार?
हीच नव्हे तर याआधीही पंकजा मुंडेंना अनेक संधी नाकारण्यात आल्या आहेत. खरं तर जनतेच्या मनातील पहिल्या महिला मुख्यमंत्री, असं त्यांना म्हटलं जातं. याच पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत प्रखर विरोधक आणि तगडी आव्हानं असताना पंकजा मुंडे अत्यंत संयमानं व्यक्त होत असतात. यंदाची संधी डावलल्यानंतर अनेकांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि एमआयएमनं सहानुभूतीही दाखवलीय. पण पंकजांनी मौनातून अजूनही संयम बाळगलाय. उद्याच्या कार्यक्रमातही हा संयम दिसून आला तर हे उत्तम राजकारण्याचं लक्षण ठरेल, असं म्हणणारा एक गट आहे. तर अस्वस्थता बोलून दाखवली तर महाराष्ट्रात नक्की राजकीय भूकंपाची शक्यता आहे, असं म्हणणाराही एक वर्ग आहे. पाहुयात उद्या काय होतंय.
Tags :
133534
10