पाथर्डी शहरात अतिक्रमणांवर हातोडा;अतिक्रमणांचा परिणाम बाजारपेठेवर
By Admin
पाथर्डी शहरात अतिक्रमणांवर हातोडा;अतिक्रमणांचा परिणाम बाजारपेठेवर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील नागरिकांनी तक्रारी केलेल्या चार अतिक्रमणे मंगळवारी हटविले. जुनी भाजीमंडई, वसंतराव नाईक पुतळ्याशेजारील, मुंडेनगरकडे जाणार्या रस्त्यावरील एक व शिवशक्तीनगरमधील एक अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली.
पालिकेतील मुख्याधिकारी संतोष लांडगे, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख गौरव आदिक, शुभम काळे, दत्तात्रय ढवळे, शिवाजी पवार व कुरेश पठाण यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचार्यांनी अतिक्रमणे हटविली. जुनी भाजीमंडई येथील सुरेश भागवत यांचे पत्र्याचे शेड हटविले. मुंडेनगरकडे जाणार्या रस्त्यावर शेळके यांची टपरी हटविली. शिवशक्तीनगरमधील एडके यांचे खुल्या जागेतील अतिक्रमण हटविले आहे.
स्व. वसंतराव नाईक पुतळ्याजवळील शिंदे यांची टपरी हटविण्यात आली. नागरिकांनी या चारही अतिक्रमणांबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या. पालिकेने एकाच दिवशी ही चारही अतिक्रमणे काढून टाकली आहेत. यावेळी किरकोळ शाब्दिक चकमक वगळता शांतता होती. शहरातील केलेले किरकोळ अतिक्रमणे काढली ठिक आहे; मात्र, धनदांडगे व विविध पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेली अतिक्रमणे काढायचे धाडस पालिकेच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी दाखवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गरिबांच्या झोपड्या मोडा; मात्र ज्यांना राजाश्रय आहे, त्यांचे अतिक्रमणे काढायला कोण येणार असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. शासकीय सर्व यंत्रणेचा समन्वय पालिका प्रशासनाने भविष्यात ठेवून पुढे होणारे अतिक्रमण रोखावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
अतिक्रमणांचा परिणाम बाजारपेठेवर
मोठ्यांची अतिक्रमणे कधी काढली जाणार, शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे झालेले विदारक चित्र बदलण्याची वेळ आता आली आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळे निर्माण होतात. दिवसेंदिवस नवनवीन अतिक्रमणे शहरात उभा राहिल्याने शहराच्या विकासाबरोबर बाजारपेठेवरही परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमणाबाबत योग्य ते पाऊले उचलून कारवाई करणे अपेक्षित आहे.