व्वा रे पठ्ठे! सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात
By Admin
व्वा रे पठ्ठे! सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात
अहमदनगर- प्रतिनिधी
राजकारणात कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाला. दुपारच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतीतील निवनियुक्त सरपंच, उपसरपंच कुटुंबासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमोद हिंदूराव यांच्याकडून शुभेच्छा मिळवत होते. तर हेच पदाधिकारी सायंकाळी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभेच्छा स्वीकारत होते. तर आज सकाळी हे सर्व शिवसनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या सोबत पाहायला मिळाले. तिन्ही पक्षाचे नेते या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकल्याची घोषणा करत होते.
अवघ्या काही तासांच्या फरकाने झालेल्या या राजकीय नाट्याची दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान याबाबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी हे सरपंच आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा केलाय तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव यांनी देखील निवडून आलेले सरपंच आमचेच असल्याच स्पष्ट केलं आहे.
राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हांशिवाय होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपल्याच पक्षाचा वरचष्मा असल्याचे सांगण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोठमोठे दावे केले जातात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर अशा दाव्यांची मोठी मालिकाच ठाणे जिल्ह्यात पहायला मिळते आहे. मात्र हे दावे करण्यासाठी निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंचांची कशी पळवापळव होते याचे बोलके चित्र मुरबाड तालुक्यात पाहायला मिळते आहे.
मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणात यंदा खुल्या गटातील महिलांसाठी सरपंच पद आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यासाठीही चुरस पहायला मिळत होती. यात दर्शना बांगर यांची सरपंच पदी एकमताने निवड झाली. तर उपसरपंचपदी सुनील बांगर यांची निवड झाली. सरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी काल दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची भेट घेतली. यावेळी हिंदूराव यांनी सरपंचांच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पट्टा टाकत त्यांचा सत्कार केला. काही मिनिटात भुवन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.खुद्द हिंदूराव यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याची माहिती दिली.
त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंचांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भुवन ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. काही मिनिटातच भुवन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.
तर सकाळी हे दोघेही शिवसनेचे ठाणे जिल्हा उपध्यक्ष सुभाष पवार यांच्या सोबत पाहायला मिळाले सरपंच आणि उपसरपंच यांच्या गळ्यात शिवसेनेचा पट्टा टाकत सेनेत प्रवेश केला. या नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंचानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली त्याच कपड्यांवर भाजप आमदारांच्या आणि सेनेच्या नेत्यांच्या भेटीला हे गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सायंकाळी भाजप आणि सकाळी शिवसेना अशा 24 तासात तीन पक्षांच्या प्रवास करणाऱ्या भुवन ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची चर्चा दिवसभर रंगली होती.