ज्ञानाचा अथांग सागर दाखविण्याचे सामर्थ्य फक्त गुरुंमध्येच - सुदर्शन महाराज शास्त्री
पाथर्डी- प्रतिनिधी
आपली भारतीय संस्कृती सर्वात जुनी व महान आहे.ती समजण्यास वेळ लागतो.संपूर्ण विश्वाचा आधार भारतीय संस्कृतीमध्ये पाहावयास मिळतो व त्याचे ज्ञान गुरू शिवाय प्राप्त होऊ शकत नाही.जीवनामध्ये नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी गुरु महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन ह.भ.प सुदर्शन महाराज शास्त्री यांनी शहरातील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालय आयोजित गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम प्रसंगी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी ढाकणे यांनीही गुरु व परमेश्वर यांचे महत्त्व सांगत संस्कृतीचा अभिमान बाळगा, विज्ञानवादी बना, गुरूच्या सानिध्यात चांगले ज्ञान मिळवा व यशस्वी व्हा, असे विद्यार्थ्यांना सांगत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी आरती हजारे ,प्रीती इंगवले, खेडकर अंजली, शिरशे सुरेखा, घुले अक्षदा या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर शिवव्याख्याते गजानन शिंदे, भगवत गीता वक्ते भाऊसाहेब शेलार, डॉ. सुभाष शेकडे व महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.शेखर ससाणे यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी रोहन कटके व आभार आर्यन गर्जे यांनी मानले.