श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपोर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने दोन लाख भाविकांची मांदियाळी
By Admin
श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपोर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने दोन लाख भाविकांची मांदियाळी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" च्या गजराने देवगडनगरी दुमदुमली
जात धर्म संप्रदाय कोणताही असू द्या, मात्र गुरुविषयी असलेल्या निष्ठेला शेवटच्या श्वासापर्यंत जपा - गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांचे आवाहन
नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांनी " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा जयघोष करत भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले."श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की जय" अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"या गजराने देवगडनगरी दुमदुमली होती.गुरू भक्तीने गुरुतत्व व गुरुकृपेचा वर्षाव आपल्यावर होत असल्याने जात, धर्म,संप्रदाय कोणताही असू द्या,गुरुविषयी असलेल्या निष्ठेला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असे आवाहन श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगि रीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधी सह यांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.यावेळी खरवंडी येथील भजनी मंडळाचा हभप के. एम. बाबा फाटके यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात जागर झाला.
यावेळी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत ज्ञानसागर कीर्तन मंडपात झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सव हरि कीर्तन प्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी गुरू महिमा व गुरू शिष्य परंपरा विषयी महत्व विविध उदाहरणे देऊन विशद केले.
यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांनी अपार तपश्चर्येतुन या क्षेत्राला संजीवनी दिली त्यांच्याच कृपाशिर्वादाने या क्षेत्राचे नंदनवन झाले हे आपल्या श्रद्धेचे फळ आहे,देवगड येथे दरवर्षी दत्तजयंती, महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा उत्सव ,सदगुरू किसनगिरी बाबांचा पुण्यतिथी सोहळा असे उत्सव उत्साहात साजरे होतात. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व संस्कार काय आहे. गुरू शिष्य परंपरा काय आहे याचा ठसा जगाच्या पटलावर उमटतात. गुरुभक्तीने गुरुतत्व व गुरुकृपेचा वर्षाव आपल्यावर जात धर्म पंथ,संप्रदाय कोणताही असू द्या गुरुबद्दल असलेल्या निष्ठेला जपा असे आवाहन करून त्यांनी गुरुपौर्णिमेच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सव प्रसंगी नारायण महाराज ससे, बाळू महाराज कानडे, गायनाचार्य रामनाथ महाराज पवार, बाबासाहेब महाराज सातपुते, संतोष महाराज चौधरी, गणपत महाराज आहेर, लक्ष्मण महाराज नांगरे, संजय महाराज निथळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, युवा नेते उदयनदादा गडाख, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, सीताराम जाधव, सेवेकरी रामजी विधाते, बजरंग विधाते, मृदुंगाचार्य दादा महाराज साबळे, अमोल महाराज बोडखे, दिनकरराव कदम, सरपंच अजय साबळे, भीमाशंकर वरखडे, सुधीर वाखुरे, उमाकांत कंक, आरोग्य सेवक भाऊसाहेब येवले यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक मोठया संख्येने देवगड नगरीत दाखल झाले होते. पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या त्यामुळे देवगड दत्त मंदिराचे प्रांगण गर्दुने फुलून गेले होते. मंदिर बाहेरील प्रांगणात विविध दुकाने थाटण्यात आल्याने गुरुपौर्णिमा उत्सवाला येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

