फिरोदिया ट्रस्टकडून आनंद ऋषिजी कोविड सेंटरला आॕक्सीजन कंसन्टेटरची भेट
By Admin
फिरोदिया ट्रस्टकडून आनंद ऋषीजी कोवीड सेंटरला ऑक्सिजन कंसन्ट्रेटरची भेट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 14 मे 2021, शुक्रवार
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी व बर्ड या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत आनंदऋषीजी कोवीड केअर सेंटर पाथर्डी शहरात सुमारे २५ दिवसांपासून कार्यरत आहे. सदरचे कोवीड सेंटर पाथर्डी तालुक्यातील महिलाकरिता चालवले जात असून या सेंटरमध्ये दररोज ४५ रुग्ण उपचार घेत असतात. सदरचे कोवीड सेंटर पूर्णतः निशुल्क आहे. या कोविड सेंटरमध्ये श्री तिलोक परिवाराकडून रुग्णांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून रुग्णांची जेवणाची, नाश्त्याची व वैद्यकीय उपचाराची जबाबदारी डॉ. दीपक देशमुख, डॉ. शिरीष जोशी, डॉ. विनय कुचेरिया यांच्याकडून पार पाडली जाते. या कोविड सेंटरला उपजिल्हा रुग्णालयाकडून डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. नगरपालिकेकडून स्वच्छतेचे काम अतिशय उत्तमरित्या पार पाडले जाते. प्रसन्न अशा वातावरणात कोरोना रुग्णांची अतिशय जिव्हाळ्याने विचारपूस करून उपचार केले जात असल्याने तसेच दररोज सकाळी प्राणायाम, ध्यानसाधना करून घेत असल्याने रुग्ण अतिशय झपाट्याने बरे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जात असताना रुग्णाकडून व त्यांच्या नातेवाइकाकडून या कोवीड सेंटर बद्दल अतिशय चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या कोवीड सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर असल्यास रुग्णावर चांगल्या प्रकारे उपचार करता येतील असे निदर्शनास आल्यानंतर ऑक्सिजन कंसन्स्टेटर मिळविण्यासाठी संस्थेचे सचिव सतिश गुगळे यांनी फिरोदिया ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार फिरोदिया यांच्याशी संपर्क करून तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीची माहिती दिली व दोन ऑक्सिजन कंसन्ट्रेटर ची मागणी केली. तालुक्यातील कोरोना साथी चे गांभीर्य ओळखून डॉ. अभय कुमार फिरोदिया यांनी तातडीने तीनच दिवसात पाच ऑक्सिजन कंसन्ट्रेटर भेट म्हणून दिले.
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि बर्डस या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीत या ५ ऑक्सिजन कंसन्ट्रेटर चे हस्तांतरण राष्ट्रसंत आनंद ऋषीजी कोविड सेंटरकडे करण्यात आले. यावेळी बोलतांना संस्थेचे सचिव सतिश गुगळे म्हणाले, या कोवीड सेंटरमध्ये ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात व इतरत्र दाखल करावे लागत होते. याबाबत रुग्णांना खूप अडचणी येत होत्या व त्रास होत होता कोरोना च्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे व रुग्णांना औषध उपचार व ऑक्सिजनची व्यवस्था करणे जिकरीचे जात होते. अडचणीच्या आपत्तीच्या वेळी फिरोदिया ट्रस्ट पुणे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मदत केली जात असल्याने आम्ही फिरोदिया ट्रस्ट पुणे यांचे अध्यक्ष अभयकुमारजी फिरोदिया यांना याबाबतची माहिती दिली असून त्यांनी तात्काळ संस्थेस फिरोदिया ट्रस्ट पुणे तर्फे पाच ऑक्सिजन कंसन्ट्रेटर भेट दिले. या ऑक्सिजन कंसन्ट्रेटर मुळे रुग्णांना इतरत्र हलवण्याची गरज पडणार नाही तसेच ऑक्सिजन कंसन्ट्रेटर उपलब्ध झाल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा कमी होऊन गरज असणाऱ्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन सहजपणे उपलब्ध होईल.
अतिशय कठीण परिस्थितीत मागणी केल्याबरोबर तात्काळ पाच ऑक्सिजन कंसन्ट्रेटर फिरोदिया अध्यक्ष अभयकुमार फिरोदिया यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल पाथर्डी तालुकावाशीयांच्या वतीने व राष्ट्रसंत आनंदऋषीजी सेंटरच्या वतीने मनापासून अभिनंदन करून आभार मानले. यावेळी संस्थेचे डॉ. दिपक देशमुख म्हणाले,सध्याच्या अतिशय अडचणीच्या परिस्थितीत रुग्णांना ऑक्सीजन कंसन्ट्रेटर ची आवश्यकता आहे. परंतु ऑक्सिजन कंसन्ट्रेटर बाजारात विकत मिळत नाही. अशा परिस्थितीत फिरोदिया ट्रस्ट यांच्याकडून झालेली मदत अतिशय मौलिक आहे. यामुळे तालुक्यातील गरीब व गरजू रूग्णांची होणारी हेळसांड व गैरसोय दूर होऊन रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यास मदत होईल. फिरोदिया ट्रस्ट कडून मिळालेल्या मौलिक मदतीबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहे.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा खेडकर, डॉ. शिरीष जोशी, संस्थेचे खजिनदार सुरेश कुचेरिया, धरमचंद गुगळे, सदस्य फुलचंद गुगळे, घेवरचंद भंडारी, सुरेश चोरडिया, चांदमल देसर्डा, डॉ. सचिन गांधी, डॉ. अभय भंडारी, विश्वजीत गुगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

