पाथर्डीत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; एक संशयित ताब्यात
पाथर्डी तालुका –पाथर्डी शहरात काल रात्री उशिरा अत्यंत धक्कादायक घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून सिमेंटचा ब्लॉक फेकून नुकसान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच परिसरात मोठी गर्दी जमली. शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेमुळे पाथर्डीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले असले, तरी सर्व स्तरांतून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.