महाराष्ट्र
वाढीव बंदोबस्ताच्या मागणीबाबत योग्य तो प्रयत्न करू
By Admin
वाढीव बंदोबस्ताच्या मागणीबाबत योग्य तो प्रयत्न करू- पोलीस महानिरीक्षक कराळे
दत्तात्रय कराळे यांनी सपत्नीक केली मोहटा देवीची महापूजा
पाथर्डी प्रतिनिधी:
राज्यातील प्रमुख देवी उत्सवापैकी मोहटा देवीचा उत्सव असून गेल्या काही वर्षांपासून गर्दी वाढत आहे. देवस्थान समिती, ग्रामपंचायत, विश्वस्त मंडळ व प्रशासनाकडून चांगले नियोजन झाले असून वाढीव बंदोबस्ताच्या मागणीबाबत योग्य तो प्रयत्न करू, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.
शारदीय नवरात्र उत्सवात मोहटा देवस्थानामध्ये येत्या गुरुवारपासून प्रारंभ होत असून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत उत्सव चालणार आहे. यंदा भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता असून प्रशासन व देवस्थान समितीने नियोजन पूर्ण केले आहे. निवासी भाविक दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी आज मोहटा देवस्थानला भेट देऊन यात्रा नियोजनाची पाहणी केली.देवीची सपत्नीक महापूजा केली.देवस्थान समितीचे मुख्य पुरोहित भूषण साकरे, बाळासाहेब शिरसागर, भास्कर देशपांडे यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यात्रा नियोजनाची परिसरात फिरून पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी स्थानिक अधिकारी व देवस्थान समितीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, गुप्त वार्ता विभागाचे भगवान सानप आदी प्रमुख उपस्थित होते.
देवस्थान समितीच्या वतीने माहिती देतांना मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे म्हणाले, विश्वस्त मंडळ ग्रामस्थ, ग्राम पंचायत व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून नियोजन पूर्ण झाले असून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत किमान १५ लाख भाविक राज्याच्या विविध भागातून देवस्थानला भेट देतील. यंदा समाधानकारक पावसाने व चांगल्या पीक परिस्थितीमुळे भाविकांची संख्या वाढणार आहे. देवस्थान समितीने स्थानिक पातळीवर सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वयंसेवक उपलब्ध करून दिले आहेत, तरीही यंदा किमान दुपटीने तरी बंदोबस्त वाढवून मिळावा, अशी मागणी केली. यावेळी चर्चा करताना कराळे म्हणाले, यात्रा सुरळीत शांततेत व पारंपारिक उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. विश्वस्त मंडळांनी यात्रा नियोजनाची चांगली तयारी केली असून दर्शन रांग, वाहतूक कोंडी, गस्तीपथक, आदींबाबत दक्षता घ्यावी, गडाचा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत ठेवून सर्वत्र माहिती व सूचना फलकाद्वारे भाविकांना मार्गदर्शन व्हावे. याबाबतचे नियोजन चांगले असून विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे सुरेश भणगे यांनी त्यांचे स्वागत केले.
Tags :
96444
10