सिव्हील'मध्ये दोन दिवसांत ऑक्सिजननिर्मिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 एप्रिल 2021
नगर जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लॅण्टचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत तो कार्यान्वित होईल. याची क्षमता जास्त नसली तरी यामुळे ऑक्सिजनसाठी येणारा भार हलका होणार आहे, अशी माहिती नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
नगर जिल्ह्याची एकूण परिस्थिती, ऑक्सिजनचा तुटवडा, अन्न व औषध खात्याचा कारभार, रुग्णालयांना ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी संवाद साधला. सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती कठीण असून, यातून वाचण्यासाठी प्रादुर्भाव रोखणे हाच सर्वांत मोठा उपाय असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे अवाहनही तनपुरे यांनी सांगितले.
तनपुरे म्हणाले, जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजननिर्मितीच्या प्लॅण्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत तो प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. त्यातून ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. याची क्षमता जरी जास्त नसली तरी ऑक्सिजनअभावी धावाधाव होणार नाही. ऑक्सिजनचा सध्या आलेला लोड यामुळे काहीसा हलका होणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा फक्त नगरमध्येच नाही; तर संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे. प्रत्यक्ष उत्पादन आणि मागणी यात तफावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधल्यानंतर बाहेरच्या राज्यांतूनही ऑक्सिजन उपलब्ध झाला, असेही तनपुरे यांनी सांगितले.
औषध प्रशासन अधिकाऱ्यांवर कारवाई करू
अन्न व औषध प्रशासनाकडून ठराविक पुरवठादाराची शिफारस करण्यात आल्याने इतर पुरवठादारांना ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे नगरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला, याकडे तनपुरे यांचे लक्ष वेधले असता, याची त्यांनी गंभीर दखल घेतली असून, चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले.