राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेच्या चेअरमनपदी दिगंबर गाडे, व्हा.चेअरमन अंबादास साठे
राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेची कार्यकारणी जाहीर
पाथर्डी प्रतिनिधी:
राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचा कारभार संत गतीने आणि पारदर्शकतेच्या अधिष्ठानावर चालू आहे. भविष्यात दोन कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सध्या पन्नास लाखांहून अधिक कर्जवाटपाची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे,असे प्रतिपादन नवनिर्वाचित चेअरमन दिगंबर गाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना केले.
राजर्षी शाहू महाराज पगारदार नोकरदारांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दिगंबर गाडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी अंबादास साठे यांची निवड एकमताने करण्यात आली. दि.१४ सप्टेंबर रोजी पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया सहकार विभागाचे एकनाथ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या वेळी नवीन संचालक मंडळाचीही स्थापना करण्यात आली असून आत्माराम दहिफळे, संदिप भागवत, संदिप उदमले, अशोक कानडे, संपत घारे, शहादेव काळे, राजेंद्र चव्हाण, मनिषा चिंधे, सुरेखा बनसोडे, शिवाजी पवार, ज्ञानेश्वर गायके यांची संचालक मंडळावर निवड करण्यात आली.
पुढे बोलतांना गाडे म्हणाले, सभासदांच्या विश्वासाला न्याय देत हितकारक निर्णय घेण्यात आले आहेत. संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळासह सर्व सभासदांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.आपली पतसंस्था फक्त आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता समाजाभिमुख उपक्रमांतून आदर्श निर्माण करेल. संघटित कार्य, परस्पर सहकार्य आणि पारदर्शकता हीच संस्थेची खरी ताकद असून, सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करीत संस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख ठरेल.
बैठकीस दिलीप तिजोरे, विकास सातपुते, बाळासाहेब सोनटक्के, व्यवस्थापक रमेश लाटणे, सर्व संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी ज्ञानेश्वर गायके यांनी सर्वांचे आभार मानले.