महाराष्ट्र
16018
10
राजळे महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात
By Admin
राजळे महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात
पाथर्डी- तालुका
आदिनाथनगर (ता. पाथर्डी) येथील दादा पाटील राजळे आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या मार्गदर्शक मा. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची जाणीव, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमासाठी मोनालीताई राहुल राजळे (सरपंच, कासार पिंपळगाव), मंगलताई कोकाटे (उपाध्यक्ष, नगर परिषद पाथर्डी), सारिकाताई उध्दव नाईक (पाथर्डी) आणि निशाताई प्रसाद मते (पाथर्डी) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण, स्वाभिमान आणि कर्तृत्व यांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी मंगलताई कोकाटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत आजच्या आधुनिक युगात शिक्षण हेच मुलींच्या प्रगतीचे सर्वात मोठे साधन असल्याचे सांगितले. मुलींनी स्वतःवर विश्वास ठेवून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थिनींमध्ये निर्माण केला. समाजातील बदलत्या परिस्थितीत मुलींनी धैर्याने पुढे जाऊन स्वतःचे स्थान निर्माण करावे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षणामुळे विचारसरणीत व्यापकता येते आणि त्यातूनच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, असेही त्यांनी सांगितले.
तसेच सारिकाताई नाईक यांनी विद्यार्थिनींना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ठेवावे आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतीही अडचण पार करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थिनींनी आपल्या वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि समाजात आदराने जगण्याची ताकद मिळते, असे त्यांनी नमूद केले.
निशाताई मते यांनी विद्यार्थिनींना आजच्या काळात मुलींसाठी शिक्षणाची अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, याचा योग्य लाभ घ्यावा असे सांगितले. ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी आवाहन केले. त्यांनी विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेचा संदेश देत शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे असे सांगितले. यावेळी त्यांनी मुलींच्या सामर्थ्यावर आधारित एक प्रेरणादायी कविता सादर करून उपस्थित विद्यार्थिनींना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात मोनालीताई राजळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत मोबाईलचा अतिरेकी वापर टाळण्याचा सल्ला दिला. मुलींनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे उच्च पदे मिळवावीत आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे असे त्यांनी सांगितले. शिक्षणाबरोबरच सुसंस्कारांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. एक स्त्री दोन घरांची पायाभरणी करते, त्यामुळे मुलींनी संस्कार, जबाबदारी आणि कर्तृत्व या तिन्ही गोष्टींचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मविश्वास आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतीही मुलगी जीवनात मोठे यश मिळवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी स्वर्गीय दादा पाटील राजळे (भाऊ) यांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरू केलेल्या या महाविद्यालयामुळे अनेक विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची संधी मिळाली असल्याचा उल्लेख करण्यात आला. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक मुलींनी विविध क्षेत्रात यश मिळवले असून त्याचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थिनींनी प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असेही सांगण्यात आले. तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासकामांचा उल्लेख करत विद्यार्थिनींना समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम. एस. तांबोळी, डॉ. निर्मला काकडे, डॉ. साधना म्हस्के आणि प्रा. प्रकाश गाढवे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. मोहिनी कुटे, प्रा. अनिता पाटोळे, रेणुका औटी, प्रा. तेजस्विनी राजळे, प्रा. ऋतुजा आठरे, श्रेयस काजळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दुर्गा भराट यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रा. योगिता इंगळे यांनी मानले.
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाबद्दलची जाणीव, आत्मविश्वास आणि समाजात सक्षमपणे उभे राहण्याची प्रेरणा निर्माण झाली.
Tags :
16018
10




