महाराष्ट्र
4813
10
प्रत्येक गावात हिवरे बाजार पॅटर्न राबवा.
By Admin
प्रत्येक गावात हिवरे बाजार पॅटर्न राबवा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 मे 2021, शनिवार
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांचे सह संगमनेर चे प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व शिर्डी चे श्री गोविंदराव शिंदे यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक गावात आता हिवरे पॅटर्न राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी त्यांनी वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्.यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि त्याची तालुका व ग्रामपातळीवर होत असलेली अंमलबजावणी याबाबत संवाद साधला.
यावेळी आदर्श गाव समितीचे अध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि पद्मश्री पोपटराव पवार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिनांक १३ आणि १४ मे रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी दिवसभरात दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला होता.
यावेळी आदर्श गाव हिवरे बाजारने कोरोना मुक्तीसाठी गावामध्ये केलेल्या उपाययोजना, रुग्णांचे विलगीकरण याची माहिती पवार यांनी सर्व सरपंच आणि ग्रामसस्तरीय अधिकारी यांना दिली होती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हाच हिवरे बाजार पॅटर्न जिल्ह्यातील सर्व गावात राबविण्याचे ठरविले असून तशा सूचना आज त्यांनी सर्व तहसीलदार आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत.
काय आहे हिवरे बाजार पॅटर्न ...
गावातील व्यक्तीनीच गावचे आरोग्य सांभाळणे ही साधी व सरळ कल्पना या पॅटर्न मध्ये राबवली असून , गावातील स्वयं सेवक गट तयार करून विविध कामांचे नियोजन करणे, प्रतेक वार्ड वाडीत आरोग्य तपासणी करणे, गावातील सर्व घरात जाऊन भेटी देणे , त्यांची आरोग्य कर्मचारी, शिक्षक यांच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करणे , सौम्य लक्षणे असेल तर विलिगिकरण करणे. गावातील बाहेरील नोकरदार मंडळी यांची नियमित तपासणी करणे. आदी बाबी यात समाविष्ट आहेत.
सदर बाबीची संगमनेर , अकोले तालुक्यात सर्व सरपंच , ग्रामसेवक, कामगार तलाठी, सामाजिक कार्यकर्ते , स्वयं सेवी संस्था यांनी कोणते ही गट, राजकारण , भेदभाव न करता ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन केले आहे. लसी करणाची यादी अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावी हा महत्वचा मुद्दा ही या पॅटर्न मध्ये आहे. मास्क चे वाटप, दूध संस्था , सेवा सोसायटी आदी ठिकाणची गर्दी टाळावी व त्या ठिकाणी पूर्ण काळजी घ्यावी असे ही या पॅटर्न मध्ये म्हंटले आहे. अत्यंत साधा व सरळ पॅटर्न ने हिवरे बाजार गाव कोरोना मुक्त आहे. जिल्ह्यातील सर्वांनी सहपरिवार , माझे गाव माझे कुटुंब ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत शिर्डीचे प्रांत अधिकारी श्री गोविंदराव शिंदे यांनी केले आहे.
Tags :

