शिरसाटवाडी फाटा ते गाव रस्ता मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील- मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे
पाथर्डी प्रतिनिधी:
तालुक्यातील शिरसाटवाडी गावाचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे गावातील नागरिक त्रस्त आहेत. फाटा ते गाव रस्त्यासाठी ग्रामविकास खात्याला पत्र व्यवहार केला असून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी या रस्त्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र देखील दिलेले असून या रस्त्यासाठी लवकरच निधी आणून हा रस्ता करणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच अविनाश पालवे यांनी म्हटले आहे.
शिरसाटवाडी गावामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना १९८७ साली झाली, परंतु गेल्या ३५ वर्षात गावामध्ये विकासाची कामे झाली नसल्याने पालवे सरपंच झाल्यानंतर शिरसाटवाडी गावामध्ये अगदी शून्यापासून सुरुवात करत रस्ते, लाईट, भूमिगत गटारे, स्ट्रीट लाईट, सिंगल फेज, पुल, सभामंडप, वीज ट्रांसफार्मर इत्यादी विविध पायाभूत सुविधांची निर्मिती त्यांनी केली असून गावातील जनतेचे कुठलेही काम असो ते सांगण्यासाठी व करण्यासाठी हक्काचा माणूस अविनाश पालवे यांच्या रूपाने उपलब्ध झाला आहे, अशी चर्चा शिरसाटवाडी ग्रामस्थांमध्ये नेहमी बघायला मिळते. गावात विकास कामे केली, परंतु जिल्हा परिषदेच्या मालकीचा व ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर असलेला फाटा ते गाव हा मुख्य रस्ता करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी लागणार असून पुढील काही महिन्यात हा निधी मंजूर करून आणणार व गावातील जनतेला सुसज्ज व अद्यावत रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सरपंच अविनाश पालवे यांनी सांगितले.