खासदार सुजय विखे पाटलांच्या मतदार संघात आमदार रोहित पवार यांनी उभारले ३०० बेडचे कोविड सेंटर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 01 मे 2021 शनिवार
आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये प्रशस्त व सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारून नागरिकांच्या आरोग्य सुविधेची सोय केली आहे. जवळपास दोन हजार खाटांची क्षमता असणाऱ्या या कोविड सेंटरमधील रुग्ण चांगले उपचार घेऊन लवकर बरेही होत आहेत. दरम्यान कर्जत जामखेडसह जिल्हातील विविध तालुक्यातील रुग्ण हे उपचारासाठी अहमदनरमधील रुग्णालयातही दाखल होत आहेत. परिणामी येथील आरोग्य सुविधेवर ताण पडू नये म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, अहमदनगर महापालिका व सार्वजनिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगरमधील पोलिस परेड ग्राऊंड येथे कोविड सेंटर उभे करण्यात आले. प्रशस्त व सुसज्ज असे सर्व सुविधांनीयुक्त हे कोविड सेंटर असून या येथे ३०० खाटा असणार आहेत. तर येथील काही खाटा या ऑक्सीजन सुविधेसह असणार आहेत.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. तर रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात कोविड सेंटरची उभारणी केली असताना आता नगर शहरात कोविड सेंटर उभारून त्यांनी पुढील तयारी तर सुरु केली तर नाही ना? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.