पाथर्डी शहरात लसीकरण केंद्रावर उपोषण
नगर सिटीझन live टीम प्रतिनिधी - 14 मे 2021, शुक्रवार
पाथर्डी : लसीकरण केंद्रावर नियम धाब्यावर बसवून हितसंबंध असणाऱ्या लोकांना अनधिकृतपणे नोंदणी न करता लसीकरण केले जाते. शिल्लक कोरोना लसीच्या डोस हे ओळखीने होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी करून गुरुवारी पाथर्डी शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील लसीकरण केंद्रासमोर उपोषण करत याप्रकरणी कारवाईची मागणी केली.
तालुक्यातील लसीकरण केंद्रावरील कर्मचारी व अधिकारी आपल्या जवळील लोकांना वशिलेबाजी ने नियमबाह्य लस टोचवली जात आहे. शिल्लक राहिलेल्या लसी परस्पर वितरीत करण्यात येत आहे. मोजक्या लसी शासनाकडून येतात, मग लसीचा कोठा पूर्ण होऊन लसी कशा शिल्लक राहतात याची चौकशी झाली पाहिजे, आदी मागण्याचे निवेदन मुकुंद गर्जे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व महसुल अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांना उपोषणापूर्वी दिले होते. यावेळी नगरसेवक बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे यांनी मध्यस्ती केली. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, डॉ.मनीषा खेडकर, आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, पालिका मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी गर्जे यांच्याशी चर्चा करून यापुढील कालावधीत कुठलाही गैरप्रकार होवू देणार नसल्याचे आश्वासन दिले.