हिवरेबाजार गाव कोरोना मुक्त - पोपटराव पवार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी- 15 मे 2021 शनिवार
राज्यातच नव्हे तर देशात आदर्शग्राम म्हणून ओळख असलेले नगर तालुक्यातील हिवरेबाजार गावाला गेल्या महिन्याभरापासून कोरोनाने ग्रासले होते. मात्र आदर्शग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे शास्त्रशुद्ध नियोजन आणि गावकऱ्यांनी प्रामाणिकपणे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची केलेली अंमलबजावणी यामुळे आता हिवरेबाजार कोरोनामुक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत ५० च्या वर ग्रामस्थांना कोरोना संसर्गाची निदान झाले होते. आता हे सर्व रुग्ण बरे झाले असून आज १५ मे रोजी हिवरेबाजार शंभर टक्के कोरोनामुक्त झाले, असे पोपटराव पवार यांनी सांगितले आहे. कोरोनाचा रुग्ण आढळताच पवार यांनी ग्राम सुरक्षा समिती आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत नियोजन केले. या नुसार गावातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी आरोग्य यंत्रणेने केली, तर ग्राम सुरक्षा कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना कडक नियम पाळण्यासाठी आवाहन करत बाधितांचे अलगिकरण, त्यांना सेवा-सुविधा दिल्या. इतर ग्रामस्थांनी आवाहन केलेले नियम प्रामाणिकपणे पाळल्याने गाव शंभर टक्के कोरोनामुक्त झाले आहे. हिवरेबाजारने अवलंबलेला कोरोनामुक्तीचा उपक्रम राज्याला आदर्शवत असाच आहे.