माजी सरपंच व ग्रामसेवकाचा प्रताप ; शासनाची केली २५ लाखांची फसवणूक
अहमदनगर- प्रतिनिधी
माजी सरपंच व ग्रामसेवकाने शासनाच्या विविध योजनांच्या निधीमधून कोणतेही काम न करता, अंदाजपत्रकांचे मुल्यांकन न घेता. संगणमत करुन २५ लाख रुपयांचा अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे घडला आहे .
याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनिल शंकर शेळके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ग्रामपंचायतीमध्ये दोघांनी दि. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत हा अपहार केला आहे. दोघांनी संगनमत करुन शासनाच्या विविध योजनांचा अपहार केला.
याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे दि.२५ जानेवारी २०२० रोजी तक्रार केली होती. याबाबतचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी या अपहाराच्या तपासासाठी तीन विस्तार अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. या समितीने सर्व रेकॉर्ड तपासून वरोष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.
त्यात हे दोघे दोषी आढळले. या तपासात दोघांनीही स्वतःच्या नावाने मोठी रक्कम काढली होती. ही बाब समोर आली. याबाबत ग्रामविस्तार अधिकारी सुनिल गुलाबराव माळी यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.