पाथर्डी- 'या' गावात टेम्पोसह 4 लाखांच्या साहित्याची चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे पेव्हिंग ब्लॉक बनविण्याच्या कारखान्यातील कामगारांनी पेव्हिंग ब्लॉक बनविण्याचे मशीन, टेम्पोसह सुमारे 4 लाखांचे साहित्य चोरले.
कारखान्याचे मालक अशोक दिनकर मरकड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मरकड यांचा पाथर्डी-नगर रोडच्या कडेला पेव्हिंग ब्लॉकचा कारखाना आहे. तेथेच मजुरांची राहण्याची व्यवस्था आहे. एक महिन्यापूर्वी मजूर पुरवणारे मनुकुमार सिंग (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) यांनी मरकड यांना कारखान्यावर कामासाठी 4 मजूर पाठवले होते. ते सगळे कारखान्यातच राहात होते.
दि. 5 सप्टेंबर रोजी कामगार रामकृष्ण बलमा (रा. प्रतापगड, जिल्हा प्रयागराज, उत्तप्रदेश) याने घरी येऊन सांगितले की, रविवारी सकाळी उठल्यानंतर मजूर लवकूश गौतम व माझील गौतम दिसले नाही. माझा मोबाईलही दिसला नाही. त्यानंतर लक्षात आले की टेम्पो, एक कलर मिक्सर मशीन, एक काँक्रिट मिक्सर मशीन, एक सिमेंट ब्लॉक मशीन, एक फवारा मशीन, एक रोटा मशीन, एक वेल्डिंग मशीन, एक कंपाउंड जाळी तयार करण्याचे मशीन, पाच एचपीची मोटार, दोन खुर्च्या, दोन बाकडे, एक बोअरवेलची मोटार असा सुमारे 4 लाख 5 हजारांचा माल चोरीस गेेला आहे. याबाबत मरकड यांच्या फिर्यादीवरून लवकूश गौतम व माझील गौतम (रा. कटरा, जिल्हा प्रयागराज, उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक के. एस. वाघ पुढील तपास करीत आहेत.