महाराष्ट्र
सोनाजी बोरुडे तरुणाचे जीपमधून अपहरण; पाच अटकेत, शेवगाव पोलिसांची कामगिरी
By Admin
सोनाजी बोरुडे तरुणाचे जीपमधून अपहरण; पाच अटकेत, शेवगाव पोलिसांची कामगिरी
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
अपहरण झालेल्या तरुणाची शेवगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात सुटका केली आहे. अपहरण करून खंडणी मागणार्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
सोनाजी छबुराव बोरुडे (वय 30, रा. शेकटे बुद्रुक, ता. शेवगाव) असे अपहृत तरूणाचे नाव आहे. या तरुणाचे चार ते पाच जणांनी गुरुवारी (दि.22) शेवगाव-गेवराई रस्त्यावरील बालमटाकळी शिवारातील साई कोटेक जिनिंग जवळून बोलेरोमधून अपहरण केले होते. अपहृत तरूणाचा पुतण्या लक्ष्मण भीमराव बोरुडे यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तरुणाची सुटका करण्यासाठी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार बडधे, पोलिस नाईक संभाजी धायतडक, कॉन्स्टेबल राजेंद्र ढाकणे, वासुदेव डमाळे यांचे पथक रवाना केले.
या पथकाने गेवराई (जि. बीड) येथे शोध घेतला. यानंतर दि. 23 रोजी सकाळी सोनाजी बोरुडे याच्या चुलत भावाच्या मोबाईलवर संपर्क करून चार ते पाच लाख रुपयाची मागणी अपहरणकर्त्यांनी केली.
ही माहिती मिळताच पोलिस पथकाने मोबाईल लोकेशनच्या मदतीने जेजुरी, बारामती पोलिसांच्या मदतीने सापळा लावून भगवान प्रल्हाद ठोसर (वय 36, रा. सिंदखेड, ता. गेवराई), कैलास केरूजी धरंधरे (वय 50, रा. साठेनगर, गेवराई, ता. गेवराई), जीवन प्रकाश करांडे (वय 30, रा. सिंदखेड, ता. गेवराई), बाळासाहेब भास्कर करांडे (वय 50 रा. मोटेगल्ली गेवराई), ज्ञानेश्वर भगवान कांबळे (वय 27, रा. साठेनगर गेवराई, ता. गेवराई) यांना अटक केली. बोरूडे याची सुटका करत गुन्ह्यात वापरलेली बोलेरो (एमएच 23 ई 9713) ताब्यात घेतली. अवघ्या चोवीस तासांत अपहृत तरुणाची सुटका करत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्याने पोलिस निरीक्षक विलास पुजारी व पथकाचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह नागरिकांनी कौतुक केले आहे.
Tags :
58328
10