बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अस्सल गावठी बियाण्यांपासून साकारली गणेश मूर्ती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले: देशभर गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या उत्सवात होत असताना बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या राहत्या घरी अस्सल गावठी बियाण्यांपासून बनवलेल्या गणरायांचे सुंदर प्रतीक साकारत मनोभावे पूजा करुन आपल्या बीज बँकेत मोठ्या थाटात स्थापना केली.
गावठी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ उभी करणाऱ्या बीज माता राहीबाई पोपेरे यांनी वाल , भात , नागली , वरई , भोपळा , मूग , उडीद , आबई , कारली , दोडका इत्यादी गावठी बियांचा वापर करून गणपतीची प्रतिकृती निर्माण केली आहे. निसर्ग पूरक गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन देशवासीयांना त्यांनी केलेले आहे. प्रदूषणमुक्त व पर्यावरणयुक्त गणरायांची स्थापना व गणेशोत्सव साजरे करण्याचे विनम्र आवाहन त्यांनी देशवासीयांना केलेली आहे.
अत्यंत मनोभावे आणि कल्पकतेने त्यांनी अस्सल गावठी बियांचा वापर करत गणरायांची प्रतिकृती साकारलेली आहे. या गणरायांला पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. आपण करत असलेल्या कामावर निस्सीम प्रेम व तेवढीच आदरयुक्त भावना ठेवत त्यांनी या गणरायाची स्थापना केलेली आहे. प्रत्येक कृतीतून पर्यावरण आणि शेतकरी यांच्यासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या गणरायाला सर्व भाविक शेतकरी आदराचे स्थान देत आहेत. गणराजाला सर्व समाज तसेच मुख्यत्वे शेतकरी आनंदी आणि सुखी ठेवण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे. पद्मश्री राहीबाई यांच्या कार्याची दखल बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेने घेऊन त्यांचे काम जगापुढे नेले आहे.