महाराष्ट्र
महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या, अन्यथा बैठा सत्याग्रह
By Admin
महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या, अन्यथा बैठा सत्याग्रह
पाथर्डी- प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग ३६१ (खरवंडी ते नवगण राजुरी) व राष्ट्रीय महामार्ग ७५२ (पैठण ते पंढरपूर) मध्ये गेलेल्या जमिनीचा व इतर मालमत्तेचा व्याजासहित त्वरित मोबदला मिळावा, अन्यथा २१ ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालयावर त्रिव्र स्वरूपाचे आंदोलन व बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा भालगावचे माजी सरपंच अंकुश कासुळे यांनी पाथर्डी- शेवगावचे विभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी विभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भालगाव, मुंगूसवाडे, कासळवाडी, मिडसांगवी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून राष्ट्रीय मार्ग क्रमांक ३६१ एफ व राष्ट्रीय महामार्ग ७५२ हे दोन्ही रस्ते गेलेले आहेत. संबंधित रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण सुद्धा जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे, परंतु सदरच्या दोन्ही रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी व इतर मालमत्ता गेलेल्या आहेत त्याचा मोबदला आजपर्यंत दिला गेलेला नाही.
जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी अनेक वेळा अर्ज व समक्ष भेटूनही मागणी केलेली आहे. तसेच उकंडा चकला फाटा येथे आंदोलन ही केलेले आहे, पण प्रत्येक वेळी शासकीय यंत्रणेने खोटी आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग औरंगाबाद यांचे कार्यालय कडून रस्त्याच्या भूमी संपादनासाठी आपल्या कार्यालयास गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी प्रस्ताव मागणी आलेली आहे. त्यानुसार आपल्या कार्यालयाकडून संबंधित खातेला आदेश देऊन भूमी संपादन, तुटलेली झाडे, घरे, बोअरवेल व इतर सर्व नुकसानग्रस्त बाबीची समक्ष पाहणी करून पंचनामे झालेले आहेत. तसेच मूल्यांकनाचीही कार्यवाही झालेली आहे. आपल्या कार्यालयाकडून वेळोवेळी मागविलेली पूर्ण माहिती सर्व शेतकऱ्यांनी सुपूर्त केलेली आहे. त्यानंतर पाथर्डी तहसील कार्यालय व आपल्या कार्यालयामध्ये अनेक वेळा बैठका घेऊन चर्चा केलेली आहे. प्रत्येक चर्चे अंती आपण विहित वेळेत मोबदला दिला जाईल, अशी आश्वासन दिले, पण त्यातील एकही आश्वासन आजतागायत पूर्ण झालेले नाही. भूमी संपादनाची आपल्या स्तरावर पूर्ण कार्यवाही झालेली आहे, परंतु शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही, हा एक आपणाकडून गरीब शेतकऱ्यावर झालेला घोर अन्याय आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर १० ऑगस्ट २०२२ रोजी घंटानाद व उपोषण शांततेच्या मार्गाने केले होते. त्यावेळीही आपण उपोषणकर्त्यांना ३० सप्टेंबर पर्यंत मोबदला दिला जाईल, अशी लेखी आश्वासन दिलेले आहे. तरीही आपल्या कार्यालयाकडून काहीही कार्यवाही झालेली नाही. आपल्या कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांस आपण वेठीस धरलेले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून आम्हा शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी योग्य न्याय व मोबदला लवकरात लवकर मिळावा, अन्यथा सर्व शेतकरी तीव्र स्वरूपात आंदोलन करून आपल्या कार्यालयाचा निषेध करीत २१ ऑक्टोबर रोजी बैठा सत्याग्रह आपल्या कार्यालयासमोर करणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. तसेच आमचे भालगांव पासून उकांडा चकला, सावरगाव, राळेसांगवी कासुळे वस्ती, संभाजीनगर, भगवान नगर व कासाळवाडी हे गाव व वस्तीवर जाणारे रस्ते आहेत. या ठिकाणी कच्चे व पक्के घर बांधलेले आहेत. सदरच्या वस्तीवर राहणाऱ्या लोकांना लाईट उपलब्ध नाही. रात्री अपरात्री अंधारात राहावे लागते. आजपर्यंत खूप प्रयत्न करूनही आम्हाला सिंगल फेज लाईट उपलब्ध नाही. तरी भालगावच्या सर्व वस्त्यावर सिंगल फेज लाईट उपलब्ध करून आमची गैरसोय दूर करावी.
सदरचे आंदोलन व बैठा सत्याग्रहाची आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या परिणामाची पूर्णतः जबाबदारी आपणावर राहील याची कृपया आपण नोंद घ्यावी. या सर्व बाबींचा विचार करून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन व बैठा सत्याग्रहापासून परावृत्त करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचा जमीन व इतर मालमत्तेचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती तहसीलदार पाथर्डी, जिल्हाधिकारी अहमदनगर, अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पाथर्डी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग औरंगाबाद, महावितरण कार्यालय पाथर्डी, पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन, आमदार मोनिका राजळे, खासदार सुजय विखे यांना देण्यात आल्या आहेत.
Tags :
1214
10