वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पाथर्डी येथील चिमुकल्याचा बुडून अंत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ज्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब लोणावळ्यात आले होते, त्याच चिमुकल्याचा वाढदिवसाच्या आदल्या रात्री स्विमिंग टॅंकमध्ये बुडून करून अंत झाल्याची दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना 13 जुलैच्या रात्री लोणावळा शहरात घडली.
यामुळे संबंधित पवार कुटुंबियांवर द:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवबा अखिल पवार (वय 2 वर्ष, रा. सध्या शिक्रापूर, शिरूर, मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. शिवबा आणि त्याची जुळी बहीण यांचा दुसरा वाढदिवस 14 जुलै रोजी होता. या दोन्ही चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार कुटुंबिय शिक्रापूर येथून 13 जुलैला लोणावळ्यात आले होते. लोणावळ्यातील तुंगार्ली विभागात असलेल्या “पुष्पव्हिला’ या बंगल्यात त्यांचा मुक्काम होता. या बंगल्यात वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
दरम्यान, बुधवारी (दि.13) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वजण बंगल्याच्या आतमध्ये वाढदिवसाची तयारी करीत असताना शिवबा हा खेळत बाहेर आला आणि त्याचा तोल जाऊन तो स्वीमिंग पूलमध्ये पडला. काही वेळानंतर शिवबा जवळ कोठेच दिसत नाही, म्हणून त्याचे आई वडील व नातेवाईक यांनी शोधा शोध सुरू केली पण तो सापडला नाही. अखेर ते जलतरण तलावाजवळ आले असता, त्यांना शिवबा जलतरण तलावाच्या पाण्यात आढळून आला. नातेवाईकांनी तत्काळ पाण्यात जाऊन शिवबाला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.