जिल्हा बॕक निवडणूक- आमदार बबनराव पाचपुतेंना धक्का देत, राहुल जगताप बिनविरोध
By Admin
जिल्हा बॕक निवडणूक - आमदार बबनराव पाचपुतेंना धक्का देत, राहुल जगताप बिनविरोध
अहमदनगर- प्रतिनिधी
आमदारकीच्या निवडणुकीत थांबले त्यावेळी ते संपले, अशी चर्चा विरोधकांनी सुरु केली. मात्र जिल्हा सहकारी बँकेत जाण्यासाठी बड्या-बड्यांना ताकत लावावी लागते, तरीही यश मिळत नाही. त्याच बँकेच्या राजकारणात श्रीगोंद्यातून सगळा विरोध मुठीत गुंडाळत थेट बिनविरोध जाण्याची किमया साधत राष्ट्रवादीचे माजी आमदार व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप हे पुन्हा एकदा `जाईंट किलर` बनले आहेत.
सेवा संस्था मतदारसंघातून जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना बँकेत रोखण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते गटाने मोठी व्यूव्हरचना केली होती. विद्यमान संचालक दत्तात्रेय पानसरे यांनी बँकेत जाण्याची पूर्ण तयारी केली होती.
तालुक्यातील १६८ सेवा संस्था मतदार आहेत. त्यांचे ठराव करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठी यंत्रणा लागली होती. मात्र शेवटी जगताप भारी ठरले आणि पानसरे यांनी या मतदारसंघात निवडणूकच न लढविण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसनेते राजेंद्र नागवडे यांनी ठरल्याप्रमाणे माघार घेतल्याने पाचपुते गट निवडणूक कशी करणार, याची उत्सुकता होती. या मतदारसंघात तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रविण कुरुमकर व बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष वैभव पाचपुते यांचे अर्ज होते. त्यातील पाचपुते यांनी सकाळीच माघार घेत जगताप यांना पाठींबा दिला. दुपारी कुरुमकर हे तर त्यांच्या नेत्यांना चकवा देत बैठकीतून थेट जगताप यांच्या वाहनात येवून बसले. त्यामुळे सगळेच चक्रावले. त्यांना माघारीपासून थांबविण्याचा मोठा प्रयत्नही झाला. मात्र कुरुमकर हे निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत नसल्याने त्यांनी माघार घेत जगताप यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा केला.
राहुल जगताप यांचे वडील कुंडलिकराव जगताप हे बँकेचे बारा वर्षे संचालक होते. त्यांनी कुकडी कारखाना व बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. राहूल जगताप यांनी आमदार व्हावे व जिल्हा बँकेत जावे, या त्यांच्या दोन्ही इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत.
दरम्यान, जगताप हे बिनविरोध बँकेत जात असल्याने आमदार पाचपुते गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा हाती आले असतानाच बँक हातून निसटल्याचे शल्य त्यांना रुचणार नाही. मात्र जगताप यांनी बँकेत प्रखर विरोधानंतरही बँकेत अशा रितीने जात त्यांची राजकीय परिपक्वता सिध्द केल्याचे बोलले जाते.