महाराष्ट्र
पाॕलिसीच्या नावाखाली बचत गटाच्या महिलांची फसवणूक
By Admin
पाॕलिसीच्या नावाखाली बचत गटाच्या महिलांची फसवणूक
त्या' व्यक्तीचा फोटो व्हायरल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बँकेच्या फायनान्स कंपनीत काम करत असून, तुम्हाला कर्ज मिळून देतो, तुमचे कर्ज मंजूर झाले आहे, विम्याच्या हप्ता म्हणून तुम्ही प्रत्येकी 1950 रुपये द्या, असे सांगत इंदिरानगर व हरिजन वस्ती येथील महिला बचत गट चालविणार्या महिलांची एका अनोेळखी व्यक्तीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची लेखी तक्रार दिली आहे.
एक अनोळखी व्यक्ती हा 28 जून रोजी इंदिरानगर येथील रत्ना दिलीप बताडे या महिलेला भेटून म्हणाला की, मी शेवगाव तालुक्यामध्ये इंडोशियन बँकेचे फायनन्स कंपनीचे काम करतो. या व्यक्तीने त्याचे नाव रणजित सर असे सांगितले. तुम्हाला प्रत्येक महिलेला चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढून देतो, असे म्हणून दि. 30 जून रोजी परत येऊन महिलांची कागदपत्रे गोळा करून घेऊन गेला. दुसर्या दिवशी येऊन म्हणाला की, तुमचे कर्ज मंजूर झाले असून, तुम्ही मला विमा पॉलिसीसाठी प्रत्येकी 1950 रूपये द्या. दि. 2 जुलै रोजी तो व्यक्ती येऊन इंदिरानगर परिसरातील 9 महिलांकडून 1950 रुपयेप्रमाणे एकूण 17 हजार 550 रुपये घेऊन गेला.
तसेच, हरिजनवस्तीमध्ये देखील याच व्यक्तीने 1950 रुपयेप्रमाणे 18 महिलांचे एकूण 35 हजार 100 रुपये नेले. दोन्ही घटनेतील एकूण 52 हजार 650 रुपयांची रक्कम तो घेऊन गेला. दि. 5 जुलै रोजी माझ्या मोठ्या सरांना घेऊन येऊन तुमचे घर पाहून पैसे वाटप करणार असल्याचे त्याने या महिलांना सांगितले.
बचत गटातील महिलांना दि. 5 जुलै रोजी त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला असता, तो फोन बंद लागत आहे. याबाबात महिलांनी अधिक चौकशी केली असता, शेवगावमध्ये अशा नावाची बँक नाही, असे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याने बचत गट चालविणार्या या महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत.
याप्रकरणी इजाज शेख, आकाश काळोखे, सचिन तरटे, रत्ना बताडे, अनिता बताडे, किरण तरटे, अनिता सोळसे, मंदा शिरसाट, सविता शिरसाट आदी महिला व सामाजिक कार्यकर्ते यांनी फसवणूक करणार्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून फसवणूक झालेल्या महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
'त्या' व्यक्तीचा फोटो व्हायरल
दरम्यान, फसवणूक करणार्या त्या व्यक्तीचा फोटो मिळून आला असून, सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने इतर ठिकाणी देखील अशा प्रकारची महिलांची फसवणूक केली असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Tags :
274
10