जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ;गाळपेर जमीनीतील पिक पाण्याखाली,शेतकऱ्यांना फटका
By Admin
राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीतही (Jayakwadi Dam Water) मोठी वाढ झाली आहे. या धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं पाण्याच्या फुगवट्यामुळं नगर जिल्ह्यातील गाळपेर जमिनीतील पिकं पाण्याखाली गेली आहेत. याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
सलग चौथ्या वर्षी जायकवाडी पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर
नाशिक आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळं जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. सलग चौथ्या वर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरणाची पाणीपातळी 82 टक्क्यांवर असून, त्यामुळं शेवगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची गाळपेर जमिनीतील पीकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची कापूस, तूर, मूग, बाजरी आणि उडीद ही पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीतील पिकांचं या वर्षी देखील मोठं नुकसान झालं आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना फटका
दरम्यान, मागील तीन वर्षांपासून जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. मागील वर्षी दहिगावने, घेवरी, भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, हिंगणगाव या गावातील शेतकऱ्यांच्या असंपादित शेतातही पाणी येऊन पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आता यावर्षी देखील शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची असंपादित क्षेत्र 117.11 हेक्टर आहे. दरवर्षी तालुक्यातील 16 गावातील 119 शेतकऱ्यांचं जायकवाडीच्या जलफुगवट्यामुळं नुकसान होत असते. मात्र, शासन-प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले होते.
जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात बहुंताश महाराष्ट्रात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झालं होतं. याचबरोब कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, काहीठिकामी शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे.