महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी ट्रकखाली चिरडून ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
वाळवणे येथून पारनेरकडे निघालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुपे पारनेर रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला.
ओंकार आदीनाथ पठारे वय २० व मयुर रामदास थोरात वय १९ अशी अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही वाळवणे येथील आहेत.
ओंकार व मयुर पारनेर महाविद्यालयात संगणक शास्त्र शाखेत पहिल्या वर्गात शिकत होते. बुधवारी दुपारी दोन वाजता त्यांना द्वितीय सत्र परिक्षेचा पेपर होता. त्यासाठी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते वाळवणे येथून मोटारसायकलवरून पारनेरकडे जाण्यासाठी निघाले होते. सुपे-पारनेर रस्त्यावर जांभूळओढा परिसरात पुढे चाललेल्या ट्रकला (क्रमांक एमएच १८ बीए ०९१८) ओलांडून पुढे जात असताना मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ एसआर ४८३८) घसरून ट्रकसमोर आली. मोटारसायकल ट्रकखाली अडकून दोघेही ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले.
घटनेची माहीती समजताच सुपे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली चिरडलेले ओंकार व मयुर यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामिण रूग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर वाळवणे येथे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघांवर वाळवणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ओंकार व मयुर हे दोघेही शेतकरी कुटूंबातील आहेत. दोघेही अभ्यासात हुषार होते. संगणक शास्त्राची पहिल्या वर्षाची परीक्षा देण्यापूर्वीच दोघांवर काळाने घाला घातला. त्यांच्या अपघाती निधनामुळे वाळवणे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.